#IPL2020 : रायडू, डुप्लेसीची खेळी; धोनीचा माइंड गेम

मुंबईचे सलामीचे अपयश कायम
आबूधाबी – चेन्नई सुपर किंग्ज संघाने शनिवारी मुंबई इंडियन्सचा पराभव केला. हा पराभव पुन्हा एकदा मुंबईच्या जिव्हारी लागला आहे. हा या स्पर्धेच्या इतिहासातील सलग आठवा सलामीचा पराभव ठरला. या विजयाचे शिल्पकार होते कर्णधार महेंद्रसिंग धोनी, अम्बाती रायडू व फाफ डुप्लेसी.
मुंबईला 162 धावांत रोखत धोनीने पहिला टप्पा यशस्वी केला व त्यानंतर रायडूने आक्रमक व डुप्लेसीने संयमी धोरण स्वीकारत मुंबईवरील दडपण कायम राखले. काही वर्षांपूर्वी आयपीएल स्पर्धेची पहिली फेरी भारताबाहेर झाली होती. त्यावेळीही मुंबईने सलग सहा सामने गमावले होते. तीच सलामीच्या सामन्यातील पराभवाची मालिका यंदाही कायम राहिली.
रायडूने गेल्या वर्षी इंग्लंडमध्ये झालेल्या विश्वकरंडक क्रिकेट स्पर्धेसाठी संघात निवड न झाल्याने रागाच्या भरात निवृत्ती जाहीर केली होती. मात्र, हा निर्णय मागे घेत त्याने पुन्हा मैदानात प्रवेश केला. मात्र, बीसीसीआयच्या निर्णयावरील रागाचा फटका शनिवारच्या सामन्यात मुंबईला बसला. त्याने भारताचा प्रमुख गोलंदाज जसप्रीत बुमराह याच्यासह मुंबईच्या सर्व गोलंदाजांची पिसे काढली.
त्यावेळी डुप्लेसीने संयमी फलंदाजी करत दुय्यम भूमिका स्वीकारली. त्यावेळी रायडू परतल्यावरही धोनीने माइंड गेम केली. आधी रवींद्र जडेजाला तर नंतर सॅम कुरेनला फलंदाजीला पाठवले. त्यामुळे धोनीची व्यूहरचना रोहित शर्माला समजलीच नाही. प्रमुख गोलंदाजांची षटके त्यात संपविण्याची धोनीची चाल यशस्वी ठरली व अखेरच्या तीन षटकांत डुप्लेसीने सामना फिरवला. या सामन्याद्वारे धोनीने पुन्हा एकदा आपणच सर्वोत्तम कर्णधार असल्याचे सिद्ध केले.





