IPL Trophy price : ‘IPL’च्या चमकदार ट्रॉफीची किंमत किती? ट्रॉफी खरंच सोन्याची असते का? किंमत एकदा पाहाच….

IPL Final 2025 | RCB vs PBKS | IPL Trophy price : आयपीएल ही जगातील सर्वात श्रीमंत टी-२० क्रिकेट लीग आहे. ही स्पर्धा नेहमीच खूप खास राहिली आहे. या काळात आयपीएलच्या चमकदार ट्रॉफीची सर्वाधिक चर्चा होते. या ट्रॉफीचे सौंदर्य अद्वितीय आहे.
तुमच्या मनात कधी आले आहे का? की बीसीसीआय कोट्यवधी रुपये खर्च करणाऱ्या आयपीएलच्या चमकदार ट्रॉफीची किंमत किती असेल आणि ती कोणत्या धातूपासून बनलेली आहे? ती ट्रॉफी फक्त सोन्याची आहे की त्यात इतर कोणतेही साहित्य वापरले आहे? आज आम्ही तुम्हाला या सर्व प्रश्नांची उत्तरे देणार आहोत.
आयपीएल ट्रॉफी कशापासून बनवली जाते?
आयपीएलमध्ये विजेत्या संघाला दिलेली ट्रॉफी सोन्यापासून बनवलेली नसून, त्यात सोन्यासोबत चांदी, अॅल्युमिनियम आणि इतर मौल्यवान धातू मिसळले जातात. आयपीएल ट्रॉफीवर शुद्ध सोन्याचे पॉलिश केले जाते, ज्यामुळे ती एक सुंदर आणि चमकदार लूक देते. ही ट्रॉफी बनवताना सोने आणि चांदीसह उच्च दर्जाचे साहित्य मिसळले जाते. या ट्रॉफीचे वजन सुमारे ६ किलो आहे आणि त्याची उंची २६ इंच आहे.
आयपीएल ट्रॉफीची किंमत किती?
आयपीएलमध्ये विजेत्या संघाला दिलेली ही ट्रॉफी सुप्रसिद्ध ज्वेलरी कंपनी ‘ओरा’ द्वारे तयार केली जाते. ही कंपनी २००८ पासून ट्रॉफी बनवत आहे. आयपीएल ट्रॉफीची किंमत कधीही सार्वजनिकरित्या जाहीर केलेली नाही, परंतु अंदाजे ३०-५० लाख रुपये असू शकते. क्रिकेटच्या जगातील सर्वात महागड्या ट्रॉफींमध्ये ही गणली जाते.
तर, ग्लोबल स्तरावर सर्वात मोठ्या मानल्या जाणाऱ्या वनडे क्रिकेट वर्ल्ड कप ट्रॉफीची किंमत अंदाजे ३०,००० डॉलर्स म्हणजेच सुमारे २६ लाख रुपये इतकी आहे. एवढी किंमत असूनही यामध्येही आयपीएल ट्रॉफी किंमतीच्या बाबतीत पुढे असल्याचं दिसून येतं आहे.
ट्रॉफी कोण ठेवते?
आयपीएलमध्ये, ट्रॉफी सहसा विजयाचे प्रतीक म्हणून संघाच्या कर्णधाराला दिली जाते. कर्णधार संघ आणि फ्रँचायझी मालकांच्या वतीने ट्रॉफी स्वीकारतो. सामन्यानंतर, एक समारंभ आयोजित केला जातो ज्यामध्ये खेळाडू ट्रॉफीसह आनंद साजरा करतात.
ट्रॉफी केवळ त्या संघाच्या कर्णधाराची किंवा मालकाची नसते, तर ती सामूहिक कामगिरीचे प्रतीक असते. ट्रॉफी फ्रँचायझीकडे म्हणजेच संघाच्या मुख्यालयात राहते.
पंजाब किंग्ज आणि रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू आमने-सामने :
दरम्यान, आयपीएल २०२५ चा अंतिम सामना आज (दि. ३) अहमदाबाद येथील नरेंद्र मोदी स्टेडियमवर खेळवला जाईल. पंजाब किंग्ज आणि रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू यांच्यात होणाऱ्या या जेतेपदाच्या सामन्यापूर्वी समारोप समारंभ होईल. त्याची थीम ‘ऑपरेशन सिंदूर’ आहे.
या कार्यक्रमासाठी तिन्ही सैन्याच्या प्रमुखांना आमंत्रित करण्यात आले आहे. मात्र, त्यांचा सहभाग अद्याप निश्चित झालेला नाही. संपूर्ण स्टेडियम तिरंगी दिव्यांनी सजवले जाईल आणि या दरम्यान गायक शंकर महादेवन यांचा लाईव्ह कॉन्सर्ट होईल.





