IPL Auction 2024 | स्टार्कबाबत गावसकरांची परखड टीका; म्हणाले “परदेशी खेळाडूंना इतके…”

मुंबई – मिचेल स्टार्क याला तब्बल 24.75 कोटी इतकी मोठी रक्कम देत कोलकाता नाइट रायडर्सने खरेदी केली. मात्र, परदेशी खेळाडूंना अशाच मोठ्या करारावर खरेदी करण्याच्या पसंतीवर विक्रमादीत्य सुनील गावसकर यांनी टीका केली आहे. स्पर्धेचा पूर्वानुभव पाहता हे खेळाडू पूर्ण मोसमासाठी उपलब्ध होतील का हे खात्रीशीर सांगू शकता का असा सवालही गावसकर यांनी व्यक्त केला आहे.
कागिसो रबाडा, जोश बटलर, जोश हेझलवूड, सम कुरेन व जोफ्रा आर्चर यांनाही कधीकाळी आयपीएलमधील विविध संघांनी मोठी बोली लावून आपल्या संघात खरेदी केले होते. मात्र, या खेळाडूंनी कधी दुखापती तर कधी राष्ट्रीय संघातून खेळण्याचे कारण दिले व स्पर्धेतील काही सामने किंवा एकही सामना न खेळता सपशेल माघार घेतली. मग अशा वेळी त्या संघांनी कीती नुकसान सोसले आहे. हा अनुभव पाठीशी असूनही यंदाही तेच घडले आहे, असे गावसकर म्हणाले.
आयपीएल स्पर्धा ज्या काळात होण्याची शक्यता आहे त्या कालावधीत अनेक देश द्विपक्षीय कसोटी किंवा अन्य मालिकेत गुंतले जाणार आहेत. किंवा आयपीएल संपण्यापूर्वी तसेच संपल्यावर लगेचच अशा मालिका आहेत मग ते मोठी रक्कम घेतलेले खेळाडू देशाला प्राधान्य देत अशा मालिकांसाठी आयपीएलमघून अंग काढून घेणार नाहीत याची खात्री कोण देणार. आर्चर, कुरेन यांनी हेच गेल्या मोसमात केले आहे. मग देशातील गुणवत्तेसाठी मोठी बोली लावण्यापेक्षा परदेशी खेळाडूंना इतके महत्व कशासाठी, असा सवालही गावसकर यांनी केला.
आपल्याकडे मॅचविनर नाहीत का?
महेंद्रसिंह धोनीसारखा खेळाडू पुन्हा मिळणार नाही परंतू सध्याच्या भारतीय संघात किंवा भारतातील देशांतर्गत स्पर्धेत असे अनेक खेळाडू आहेत की जे मॅचविनर ठरत आहेत. मग त्यांच्या गुणवत्तेवर आपण का विश्वास ठेवत नाही. शोधले तर आयपीएलच्या प्रत्येक संघात किमान एक भारतीय मॅचविनर खेळाडू गवसेल, असा विश्वासही गावसकर यांनी व्यक्त केला.





