IPL 2026 Start Date : आयपीएल २०२६ चं बिगुल वाजलं! ‘या’ तारखेपासून सुरू होणार क्रिकेटचा महाकुंभ
IPL 2026 Start Date : ब्रॉडकास्टर स्टार स्पोर्ट्सने आयपीएल २०२६ च्या सुरुवातीची तारीख जाहीर केली आहे. यंदा आयपीएलच्या १९व्या हंगामाला या दिवशी सुरुवात होणार आहे.

IPL 2026 Start Date Confirm : भारत आणि न्यूझीलंड यांच्यातील विश्वचषक फायनलच्या पूर्वसंध्येला ब्रॉडकास्टर स्टार स्पोर्ट्सने आयपीएल २०२६ च्या सुरुवातीची तारीख जाहीर केली आहे. यंदा आयपीएलच्या १९व्या हंगामाला २८ मार्च पासून सुरूवात होणार असल्याचे निश्चित झाले आहे. मात्र, अद्याप संपूर्ण सामन्यांचे वेळापत्रक (Fixtures) प्रसिद्ध करण्यात आलेले नाही.
वेळापत्रकास उशीर का?
बीसीसीआयच्या (BCCI) अधिकाऱ्यांनी दिलेल्या माहितीनुसार, अनेक राज्यांमध्ये असलेल्या निवडणुकांचे वेळापत्रक आणि मतमोजणीच्या तारखांमुळे आयपीएलचे नियोजन करणे आव्हानात्मक ठरत आहे. मतदानाच्या दिवशी सामने आयोजित केल्यास सुरक्षा व्यवस्थेवर परिणाम होऊ शकतो, त्यामुळे अधिकृत तारखा निश्चित करण्यापूर्वी बोर्ड निवडणूक आयोगाच्या पुष्टीची वाट पाहत आहे.
आरसीबी: डिफेंडिंग चॅम्पियन आणि होम ग्राउंड –
🚨 Announcement 🚨
Get ready! #TATAIPL2026 is all set to start from the 28th of MARCH! pic.twitter.com/RF4Ixvo1J5
— Star Sports (@StarSportsIndia) March 8, 2026
गेल्या हंगामात पंजाब किंग्सला सहा धावांनी हरवून जेतेपद पटकावणारा रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू (RCB) संघ यंदा डिफेंडिंग चॅम्पियन म्हणून मैदानात उतरेल. कर्नाटक स्टेट क्रिकेट असोसिएशनने (KSCA) जाहीर केल्यानुसार, एम. चिन्नास्वामी स्टेडियम आरसीबीच्या पाच होम मॅचेससह स्पर्धेचा अंतिम सामना आणि एक प्ले-ऑफ सामना आयोजित करेल. आरसीबीचे उर्वरित दोन होम सामने रायपूरमधील शहीद वीर नारायण सिंह आंतरराष्ट्रीय स्टेडियमवर खेळवले जातील.
सुरक्षेच्या उपाययोजनांवर विशेष भर –
गेल्या वर्षी जूनमध्ये आयपीएल २०२५ च्या जेतेपदाच्या सेलिब्रेशन दरम्यान चिन्नास्वामी स्टेडियमवर चेंगराचेंगरी झाली होती, ज्यात ११ जणांचा मृत्यू झाला होता. या दुर्घटनेनंतर स्टेडियममध्ये सुरक्षा आणि गर्दी व्यवस्थापनाचे नियम अत्यंत कडक करण्यात आले आहेत. आरसीबीने बेंगळुरूमध्ये सामने आयोजित करण्यासाठी कर्नाटक सरकार आणि पोलिसांचे आभार मानले आहेत.





