Rashid Khan Controversy : “आमचं रक्त शोषताय, आता चालते व्हा!” पाकिस्तानात राहणाऱ्या राशिद खानला पाकच्या मंत्र्यानं सुनावलं
Rashid Khan Controversy : ख्वाजा मुहम्मद आसिफ यांनी अफगाण नागरिकांना 'कृतघ्न' म्हणत राशिद खानला पाकिस्तान सोडून दुसरीकडे शरण घेण्यास सांगितले आहे.

Khawaja Asif Rashid Khan Controversy : अफगाणिस्तानातील वाढत्या सुरक्षेच्या धोक्यांमुळे स्टार क्रिकेटर राशिद खान आणि त्याचे कुटुंब सध्या पेशावरमध्ये वास्तव्यास असल्याच्या बातम्या समोर आल्या आहेत. या पार्श्वभूमीवर पाकिस्तानचे संरक्षण मंत्री ख्वाजा मुहम्मद आसिफ यांनी सोशल मीडिया प्लॅटफॉर्म ‘एक्स’वर एक अत्यंत वादग्रस्त पोस्ट शेअर केली आहे. त्यांनी अफगाण नागरिकांना ‘कृतघ्न’ म्हणत राशिद खानला पाकिस्तान सोडून दुसरीकडे शरण घेण्यास सांगितले आहे.
संरक्षण मंत्र्यांची ‘विखारी’ टीका –
ख्वाजा आसिफ यांनी आपल्या पोस्टमध्ये म्हटले की, “अफगाण नागरिक केवळ कृतघ्न नाहीत, तर जे त्यांना सुरक्षा आणि जगण्याची आशा देतात, त्यांच्याविरुद्धच ते विष ओकतात. जर राशिद खान पेशावरमध्ये असेल, तर त्याने दुसरीकडे कुठेतरी आश्रय घ्यावा. अनेक लोक वर्षानुवर्षे आमचे रक्त शोषत आहेत, आता त्यांनी घरी परतले पाहिजे. तालिबानच्या सत्तेमुळे अफगाणिस्तान आता ‘स्वर्ग’ बनला आहे, मग तिथेच राहा.”
राशिद खानने अफगाणिस्तान का सोडले?
Breaking News: Afghanistan star all rounder Rashid Khan is currently living in Peshawar, Pakistan. Due to security concerns in Kabul ,Afghanistan.#Afghanistan #rashidkhan pic.twitter.com/mJiPRG8a4u
— worldwatch (@CuriousMind614) March 8, 2026
२०२१ मध्ये तालिबानने सत्ता हस्तगत केल्यानंतर अफगाणिस्तानात आर्थिक संकट, मानवाधिकार उल्लंघन आणि अस्थिरता वाढली आहे. यामुळे राशिद खानसारख्या अनेक हाय-प्रोफाइल नागरिकांनी सुरक्षिततेसाठी इतर देशांत स्थलांतर केले आहे. पेशावर हे अफगाण सीमेजवळ असल्याने आणि तिथे मोठी अफगाण लोकसंख्या असल्याने राशिदने तिथे आश्रय घेतल्याचे सांगितले जाते.
कर्तृत्वाचा आलेख आणि कर्णधारपदावरून गच्छंती
जगातील सर्वोत्तम टी-२० गोलंदाज मानल्या जाणाऱ्या राशिद खानच्या नावावर ५०० हून अधिक विकेट्स आहेत. त्याने ११७ वनडेत २१० आणि ११५ टी-२० सामन्यांत १९३ विकेट्स घेतल्या आहेत. नुकत्याच पार पडलेल्या टी-२० विश्वचषकात अफगाणिस्तानचा संघ पहिल्याच फेरीतून बाहेर पडल्याने राशिदकडून कर्णधारपद काढून घेण्यात आले असून, आता इब्राहिम झाद्रानकडे ही जबाबदारी सोपवण्यात आली आहे.





