IPL 2025 Playoffs : चंदीगडच्या रणसंग्रामात कोण मारणार बाजी? जाणून घ्या चारही संघांचा प्लेऑफमधील रेकॉर्ड

IPL 2025 Playoffs Updates : आयपीएल २०२५ चा हंगाम आता अंतिम चप्प्यात पोहोचल्यानंतर या स्पर्धेतील रोमांच प्रचंड वाढला आहे. या हंगामातील पहिला क्वालिफायर -१ सामना पंजाब किंग्ज आणि रॉयल चॅलेंजर्स बंगळुरु यांच्यात २९ मे रोजी खेळला जाणार आहे. यानंतर एलिमिनेटर सामना गुजरात टायटन्स आणि मुंबई इंडियन्स यांच्यात ३० मे रोजी खेळला जाणार आहे. दोन्ही सामने चंदीगड येथे होणार आहेत. तत्पूर्वी या चार संघांचा प्लेऑफमधील रेकॉर्ड कसा आहे जाणून घेऊया.
पंजाब किंग्ज (PBKS) :
पंजाबने आतापर्यंत प्लेऑफमध्ये ४ सामने खेळले आहेत, ज्यात त्यांना फक्त १ विजय मिळवता आला आहे. यामध्ये त्यांची सर्वोच्च धावसंख्या २२६ धावा राहिली आहे. त्याचबरोबर सर्वात नीचांकी धावसंख्या ११७ धावा राहिली आहे. मात्र, अद्यापही पंजाबला एकही जेतेपद पटकावता आलेले नाही.
रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू (RCB) :
आयपीएलच्या आतापर्यंतच्या इतिहासात आरसीबी संघ एकूण १२ सामने खेळला आहे. त्यापैकी ७ सामन्यात विजय मिळवला असून पाच सामन्यात पराभव झाला आहे. आरसीबीची प्लेऑफमधील सर्वोच्च धावसंख्या २०७ धावा राहिली असून नीचांकी धावसंख्या १३१ धावा राहिली आहे. तरीही, त्यांना अद्याप एकही आयपीएल चषक जिंकलेला नाही. चाहत्यांची आशा आहे की यंदा आरसीबी जेतेपदावर आपले नाव कोरेल.
गुजरात टायटन्स (GT) :
गुजरात टायटन्सने आयपीएल स्पर्धेत २०२२ मध्ये पदार्पण केले होते. त्यांनी आतापर्यंत प्लेऑफमध्ये ३ सामने खेळले असून, २ विजय मिळवले आहेत आणि एक पराभव पत्करावा लागला आहे. प्लेऑफ फेरीतील त्यांची सर्वोच्च धावसंख्या २३३ धावा आहे. त्याचबरोबर सर्वात नीचांकी धावसंख्या १५७ धावा आहे. विशेष म्हणजे, त्यांनी 2022 मध्ये आपल्या पदार्पणाच्या वर्षीच चषक जिंकला, ज्यामुळे त्यांची कामगिरी कौतुकास्पद ठरते.
हेही वाचा – LSG vs RCB : आरसीबीने रचला इतिहास! आयपीएलमध्ये ‘हा’ मोठा पराक्रम करणारा ठरला पहिलाच संघ
मुंबई इंडियन्स (MI) :
मुंबई इंडियन्स आयपीएल इतिहासातील सर्वात यशस्वी संघ ठरला आहे. त्यांनी प्लेऑफमध्ये १४ सामने खेळले असून त्यापैकी ८ जिंकले आहेत आणि ६ गमावले आहेत. प्लेऑमध्ये मुंबईची सर्वोच्च धावसंख्या २०० धावा असून नीचांकी धावसंख्या १४४ धावा आहे. विशेष म्हणजे या संघाने पाचवेळा जेतेपद पटकावले आहे. ज्यामध्ये २०१३, २०१५, २०१७, २०१९, आणि २०२० सालाचा समावेश आहे.





