Junior Davis Cup 2025 : पाकिस्तानच्या खेळाडूचा पराभवानंतर रडीचा डाव, हस्तांदोलन करताना भारतीय खेळाडूशी घेतला पंगा
Updated On:

Junior Davis Cup 2025 India-Pakistan Players Handshake Controversy Video : कझाकस्तानमधील श्यामकेंट येथे २४ मे रोजी झालेल्या ज्युनियर डेव्हिस कप अंडर-१६ स्पर्धेत भारताने पाकिस्तानचा २-० असा पराभव करून शानदार विजय मिळवला. भारतीय संघातील प्रकाश सरन आणि तविश पाहवा यांनी सुपर टाय-ब्रेकमध्ये आपापल्या एकेरी सामन्यात विजय मिळवून संघाला निर्णायक आघाडी मिळवून दिली. मात्र, या विजयाव्यतिरिक्त, सामन्याच्या तीन दिवसांनी व्हायरल झालेल्या एका व्हिडीओमुळे एक नवीन वाद निर्माण झाला आहे.
या व्हायरल व्हिडीओ क्लिपमध्ये पाकिस्तानी खेळाडू भारतीय खेळाडूसोबत असभ्यपणे हस्तांदोलन करताना दिसतो.. सोशल मीडियावर व्हायरल होत असलेल्या व्हिडिओमध्ये, एक पाकिस्तानी खेळाडू पराभवानंतर भारतीय टेनिसपटूसोबत अतिशय असभ्यपणे हस्तांदोलन करताना दिसत आहे. हस्तांदोलन करताना त्या पाकिस्तानी खेळाडूने भारतीय खेळाडूकडे जोरात हात भिरकावला. सुदैवाने तो हात भारतीय खेळाडूच्या चेहऱ्यावर लागता लागता वाचला.
व्हिडीओ होतोय व्हायरल –
🇮🇳 India – 🇵🇰 Pakistan Handshake Drama at the Junior Davis Cup in Kazakhstan
India beat Pakistan 2-0 pic.twitter.com/mI85JBETCo
— Indian Tennis Daily (ITD) (@IndTennisDaily) May 27, 2025
त्यानंतर दुसऱ्या प्रयत्नात, पाकिस्तानी खेळाडू मिकाईल अली बेगने हस्तांदोलन केले पण त्याने काही क्षणातच त्याचा हात बाजूला केला, ज्यामुळे त्याची पराभवानंतरची निराशा स्पष्टपणे दिसून आली. हा सर्व प्रकार घडला तेव्हा तविश पाहवाने खूप परिपक्वता आणि संयम दाखवला. या घटनेवर त्याने कोणतीही वाईट प्रतिक्रिया दिली नाही किंवा काहीही अनुचित वर्तन केले नाही.
या घटनेनंतर पाकिस्तानी खेळाडू मिकाईल अली बेग त्याच्या असभ्य वागण्यामुळे सोशल मीडियावर टीकेचा विषय ठरला. टेनिस चाहत्यांनी आणि सोशल मीडिया युजर्स पाकिस्तानी खेळाडूवर जहरी टीका करताना भारतीय खेळाडूचे कौतुक करत आहेत. स्पर्धेत भारताच्या विजयासोबतच ही घटना देखील चर्चेचा विषय बनली आहे.





