Eden Gardens Pitch : ‘त्याला त्याचे मत देण्यासाठी पैसे मिळत नाहीत’, पिच क्युरेटरने अजिंक्यचा अनादर केल्यानंतर माजी दिग्गज संतापला

IPL 2025 Eden Gardens pitch curators disrespects Ajinkya Rahane : आयपीएल २०२५ स्पर्धेला दणक्यात सुरुवात झाली आहे. दरम्यान, कोलकाता नाईट रायडर्स (केकेआर) संघ ईडन गार्डन्सच्या खेळपट्टीवर पूर्णपणे समाधानी नाही. पिच क्युरेटर सुजान मुखर्जी यांनी स्पष्ट केले आहे की ईडन गार्डन्सच्या पिचमध्ये कोणताही बदल होणार नाही. ही खेळपट्टी वेगवान गोलंदाजांना बाऊन्स, कॅरी आणि मूव्हमेंट देते. त्यांनी केकेआरचा कर्णधार अजिंक्य रहाणेची मागणी फेटाळून लावली, ज्यामध्ये त्याने फिरकीपटूंसाठी उपयुक्त अशी खेळपट्टी मागितली होती. आता या प्रकरणावर न्यूझीलंडचे माजी वेगवान गोलंदाज सायमन डौल आणि प्रसिद्ध समालोचक हर्षा भोगले यांनी प्रतिक्रिया दिली आहे.
काय आहे प्रकरण?
आरसीबीविरुद्धच्या घरच्या मैदानावर दारुण पराभव पत्करावा लागल्यानंतर केकेआरने राजस्थान रॉयल्सविरुद्ध जबरदस्त पुनरागमन करत हंगामातील आपल्या पहिल्या विजयाची नोंद केली. यानंतर हर्षा भोगले आणि सायमन डौल यांनी पिच क्युरेटर सुजान मुखर्जी यांच्यावर टीका केली. ते म्हणाले की मुखर्जी यांनी केकेआरला ‘होम अॅडव्हान्टेज’चा फायदा घेऊ दिला नाही. भोगले यांनी स्पष्ट केले की अजिंक्य रहाणेने जास्त वळण घेणाऱ्या खेळपट्टीची मागणी केली नव्हती. त्याला फक्त खेळपट्टी फिरकीपटूंसाठी थोडीशी मदत करणारी हवी होती. केकेआरची ओळख नेहमीच उत्कृष्ट फिरकी गोलंदाजी ही राहिली आहे. २०१२ आणि २०१४ मध्ये गौतम गंभीरच्या नेतृत्वाखाली आयपीएल ट्रॉफी जिंकल्यानंतर संघाचे सुवर्णकाळ आले. त्यावेळी, ईडन गार्डन्सची खेळपट्टी फिरकीपटूंसाठी उपयुक्त होती, ज्यामुळे केकेआरला मोठा फायदा झाला.
अजिंक्य रहाणे काय म्हणाला होता?
https://twitter.com/de_deepjyoti24/status/1904962882376470979
आयपीएल २०२५ च्या पहिल्या सामन्यात, आरसीबीने ईडन गार्डन्सच्या सपाट खेळपट्टीवर केकेआरला हरवले. या पराभवानंतर, केकेआरचा कर्णधार अजिंक्य रहाणेने फिरकीपटूंसाठी अधिक उपयुक्त असलेल्या खेळपट्ट्यांच्या गरजेवर भर दिला. तो म्हणाला, “आम्हाला अशी खेळपट्टी पहायला आवडली असती, जी फिरकी गोलंदाजांना मदत करू शकली असती. पण शेवटच्या दीड दिवसापासून ही खेळपट्टी कव्हरखाली होती. आमचे फिरकी गोलंदाज खूप चांगले आहेत आणि कोणत्याही प्रकारच्या खेळपट्टीवर गोलंदाजी करू शकतात. मला खात्री आहे की ते पुढेही आत्मविश्वासाने खेळतील.”
केकेआरच्या खेळपट्टीवर हर्षा भोगलेंची प्रतिक्रिया –
हर्षा भोगले क्रिकबझच्या शोमध्ये म्हणाले, “मी केकेआर क्युरेटरचे विधान पाहिले आहे. जर मी केकेआर संघासोबत असतो, तर हे ऐकून मला खूप निराशा झाली असती. आम्ही १२० धावांची संथ खेळपट्टी मागत नाही आहोत. आम्ही असेही म्हणत नाही आहोत की खेळपट्टी २४० धावा करण्यास सक्षम असावी. आम्हाला फक्त अशी खेळपट्टी हवी आहे जिथे आमच्या गोलंदाजांना मदत मिळेल आणि आम्ही सामना जिंकू शकू. आयपीएलसारख्या स्पर्धेत घरच्या मैदानाचा फायदा असणे महत्त्वाचे आहे. यामुळे लीगचा उत्साह वाढेल, कारण त्यानंतर परदेशी मैदानांवर जिंकण्याचे महत्त्वही वाढेल.”
हेही वाचा – CSK vs RCB : आरसीबी १७ वर्षांचा दुष्काळ संपवणार का? दुसऱ्या सामन्यात सीएसकेचा बालेकिल्ला भेदण्याचे आव्हान
सायमन डूल यांनीही उपस्थित केले प्रश्न –
न्यूझीलंडचे माजी वेगवान गोलंदाज सायमन डूल म्हणाले की, “जर ईडन गार्डन्सचे पिच क्युरेटर केकेआरच्या गरजांकडे दुर्लक्ष करत असतील तर फ्रँचायझीने त्यांचे घरचे सामने इतरत्र हलवण्याचा विचार करावा. केकेआर स्टेडियमचे शुल्क भरत आहे आणि आयपीएलचा भाग होण्यासाठी पैसे देत आहे. असे असूनही जर त्यांच्या गरजांकडे दुर्लक्ष केले जात असेल, तर संघाने त्यांचे सामने इतरत्र आयोजित करावेत. तसेच क्युरेटरचे काम खेळावर आपले मत देणे नाही. त्याला यासाठी पैसे मिळत नाहीत.”





