IPL 2024 (LSG vs MI Match 48) : लखनौ विरुद्धच्या पराभवानंतर मुंबईचा कर्णधार हार्दिकला बसला आणखी एक मोठा धक्का…

IPL 2024 (LSG vs MI Match 48, Hardik Pandya) : आयपीएल 2024 मध्ये मंगळवारी मुंबई इंडियन्सला सातव्यांदा पराभवाला सामोरे जावे लागले. हार्दिक पांड्याच्या नेतृत्वाखाली मुंबईसाठी प्लेऑफचा मार्ग कठीण झाला आहे. मात्र, या पराभवानंतर हार्दिकला आणखी एक मोठा धक्का बसला आहे. स्लो ओव्हर रेटसाठी बीसीसीआय आणि आयपीएल गव्हर्निंग कौन्सिलने त्याला 24 लाखांचा दंड ठोठावला आहे. त्याच्याशिवाय मुंबईच्या इतर खेळाडूंनाही दंड ठोठावण्यात आला आहे. मंगळवारी एकना येथे खेळल्या गेलेल्या सामन्यात लखनौने मुंबईचा चार गडी राखून पराभव केला.
हार्दिक ठरला दुसऱ्यांदा दोषी….
हार्दिकला या मोसमात दुसऱ्यांदा स्लो ओव्हर रेटसाठी दंड ठोठावण्यात आला आहे. याआधी तो मुल्लानपूरमध्ये पंजाब किंग्जविरुद्धही दोषी आढळला होता. आयपीएलच्या अधिकृत विधानानुसार, उर्वरित मुंबईच्या खेळाडूंना (इम्पॅक्ट प्लेअरसह) 6 लाख रुपये किंवा मॅच फीच्या 25 टक्के दंड ठोठावण्यात आला आहे. जे कमी असेल ते लागू होईल. हार्दिक पांड्यानं या हंगामात दोनदा ही चूक केली आहे, जर तो आणखी एकदा स्लो ओव्हर रेटमध्ये पकडला गेला तर त्याच्यावर 1 सामन्याची बंदी घातली जाऊ शकते.
इतरही कर्णधारांना ठोठावण्यात आला आहे दंड…
याआधी दिल्लीचा कर्णधार ऋषभ पंत, कोलकाताचा कर्णधार श्रेयस अय्यर आणि चेन्नईचा कर्णधार रुतुराज गायकवाड यांनाही स्लो ओव्हर रेटसाठी दंड ठोठावण्यात आला आहे.
मुंबईची हाराकिरी कायम….
सामन्याबद्दल बोलायचे झाले तर मुंबईने प्रथम फलंदाजी करताना 20 षटकात 7 गडी गमावून 144 धावा केल्या. इशान किशनने 36 चेंडूत 32 धावा, नेहल वढेराने 41 चेंडूत 46 धावा आणि टीम डेव्हिडने 18 चेंडूत नाबाद 35 धावा केल्या. प्रत्युत्तरात लखनौने 19.2 षटकांत सहा गडी गमावून लक्ष्य गाठले. केएल राहुलने 22 चेंडूत 28 धावा केल्या. तर मार्कस स्टॉइनिसने 45 चेंडूत 62 धावा केल्या.
Slow over rate : काय आहे नियम…
स्लो ओव्हर रेटच्या नियमांनुसार, ही चूक पहिल्यादा झाल्यास कर्णधाराला केवळ 12 लाख रुपयांचा दंड आकारला जातो. दुसऱ्यांदा ही चूक झाल्यास कर्णधाराला 24 लाखांचा दंड तर संघातील इतर खेळाडूंनाही 6 लाख रुपये किंवा मॅच फीच्या 25% दंड ठोठावण्यात येतो.
तिसऱ्यांदा ही चूक केल्यावर कर्णधारावर 30 लाख रुपयांसह एका सामन्याची बंदी घालण्यात येते, यासोबतच संघातील उर्वरित खेळाडूंना प्रत्येकी 12 लाख रुपये किंवा 50 टक्के दंड आकारण्यात येतो.





