#IPL2023 : कोहलीच्या RCBला मोठा झटका, पहिल्या सात सामन्यांतून….

नवी दिल्ली – इंडियन प्रीमियर लीग 2023 स्पर्धेला 31 मार्चपासून म्हणजेच आजपासून सुरुवात होत आहे. या मोसमात 52 दिवस एकूण 74 सामने खेळवले जाणार आहेत. आयपीएलचा 16वा सीझन पुन्हा पूर्वीच्या होम-अवे पद्धतीने होणार आहे, म्हणजेच संघ घरच्या आणि प्रतिस्पर्ध्यांच्या मैदानावर सामने खेळताना दिसणार आहेत. प्रत्येक संघ 7 सामने घरच्या मैदानावर आणि 7 सामने प्रतिस्पर्ध्यांच्या मैदानावर खेळणार आहे.
फॅफ डुप्लेसिसच्या नेतृत्वाखालील रॉयल चॅलेंजर्स बंगळुरूचा संघ आपल्या घरच्या मैदानावर खूप मजबूत मानला जातो. मात्र, यंदा संघ अनेक खेळाडूंच्या दुखापतींशी झुंजत आहे. विल जॅक्स दुखापतीमुळे आधीच आयपीएलमधून बाहेर पडला आहे. त्याचवेळी आता संघाला आणखी एक धक्का बसू शकतो. वेगवान गोलंदाज जोश हेझलवूड अद्याप दुखापतीतून सावरलेला नाही. अशा स्थितीत तो आरसीबीच्या किमान पहिल्या सात सामन्यांतून बाहेर राहू शकतो. मीडिया रिपोर्ट्सनुसार, तो संपूर्ण सीझनसाठी बाहेर असण्याची शक्यता आहे.
याशिवाय अष्टपैलू खेळाडू ग्लेन मॅक्सवेलही पहिल्या सामन्यात खेळणार का? याबाबत साशंकता आहे. गेल्या वर्षी मॅक्सवेलच्या पायाला गंभीर दुखापत झाली होती. त्यानंतर तो एकही सामना खेळू शकला नाही. अलीकडेच मॅक्सवेलने भारताविरुद्धच्या एकदिवसीय मालिकेत पुनरागमन केले, पण विशेष अशी तो कामगिरी करू शकला नाही. RCB त्यांचा पहिला सामना 2 एप्रिल रोजी मुंबई इंडियन्स विरुद्ध बेंगळुरू येथे खेळणार आहे. मीडिया रिपोर्ट्सनुसार, पायाला फ्रॅक्चर झाल्यानंतर मॅक्सवेल पूर्णपणे बरा झालेला नाही. अशा स्थितीत पहिल्या सामन्यात त्याच्या खेळण्यावर साशंकता आहे.
त्याचवेळी हेजलवूड 14 एप्रिलपर्यंत विश्रांती घेणार आहे. त्यानंतर परिस्थिती पाहून पुढील सामन्यांत तो खेळणार की नाही याबाबतचा निर्णय होईल. हेजलवूड दुखापतीमुळे भारताविरुद्धच्या कसोटी आणि त्यानंतर वनडे मालिकेलाही मुकला होता. हेझलवूडला आयपीएलच्या माध्यमातून अॅशेसची तयारी करण्याची आशा आहे. तो म्हणाला- T20 साठी जास्त वर्कलोड करण्याची आवश्यकता नाही. फक्त मूलभूत गोष्टींवर लक्ष केंद्रित करणे गरजेचे असते. लय पकडण्यासाठी मला कदाचित फक्त एक किंवा दोन सत्र पूर्ण करावे लागतील, असे त्याने म्हटले आहे.
तो पुढे म्हणाला म्हणाला की, टी-20 हा कसोटी आणि अगदी एकदिवसीय क्रिकेटपेक्षा खूप वेगळा आहे. लहान फॉरमॅटमध्ये, तुमची लय शोधण्यासाठी तुम्हाला फक्त 20 चेंडू लागतील. 32 वर्षीय हेझलवूड भारताला रवाना होण्यापूर्वी क्रिकेट ऑस्ट्रेलियाकडून वैद्यकीय मंजुरीची प्रतीक्षा करत आहे. हेजलवूड म्हणाला की, अॅशेसच्या तयारीसाठी मला गोलंदाजी करावी लागेल, त्यामुळे आयपीएलमध्ये खेळणे माझ्यासाठी फायदेशीर ठरू शकते.
दरम्यान, हेजलवूडने गेल्या वर्षी आयपीएलमध्ये 12 सामन्यांत 20 विकेट घेतल्या होत्या. त्याचा फायदा त्याला टी-20 वर्ल्ड कपमध्ये झाला होता.






