पुणे | टेकडी, घाट परिसरात गुन्हे केलेल्यांची चौकशी

पुणे, {प्रभात वृत्तसेवा} – बोपदेव घाटासह शहरातील प्रमुख घाट, टेकडी परिसरात यापूर्वी लूटमार, दरोडा, विनयभंग, तसेच बलात्कारासारखे गंभीर गुन्हे केलेल्या सराईत गुन्हेगारांची पोलिसांकडून चौकशी करण्यात येत आहे.
अद्यापपर्यंत घटना स्थळानजीकची ४० गावे धुंडाळण्यात आली असून, सुमारे ४५० रेकॉर्डवरील गुन्हेगारांची पोलिसांनी कसून चौकशी केली आहे.
बोपदेव घाट परिसरात गुरुवारी (दि. ३) रात्री मित्राबरोबर फिरायला आलेल्या तरुणीवर तिघांनी सामूहिक बलात्कार केला. त्यानंतर पसार झालेल्या आरोपींचा अद्याप शोध लागला नसून, पोलिसांकडून युद्धपातळीवर तपास सुरू आहे.
यासाठी पोलिसांनी ६० तपास पथके तयार केली आहेत, तसेच गेल्या पंधरा दिवसांत बोपदेव घाटमार्गे गेलेल्या सुमारे ५० हजार मोबाइल वापरकर्त्यांची माहिती संकलित करण्यात आली असून, या माहितीचे तांत्रिक विश्लेषण करण्यात येत आहे. याशिवाय यापूर्वी शहरातील प्रमुख टेकड्या, घाट परिसरात विनयभंग, बलात्कार, दरोडा असे गंभीर गुन्हे केलेल्या आरोपींचीही चौकशी करण्यात आली आहे.
घटना स्थळापासून जवळ असलेल्या सुमारे ४० छोट्या- मोठ्या गावांमध्ये जाऊन पोलिसांनी पाहणी केली. त्या गावातील ढाबे, दारू विक्रेते, अवैध व्यवसाय करणाऱ्यांकडे चौकशी करून माहिती घेण्यात आली आहे.
पोलिसांनी रस्त्याकडेला असलेल्या अनेक हॉटेलवरील सीसीटीव्ही तपासले. मात्र, त्यामध्ये पूर्ण रस्त्यावरील परिसर दिसत नसल्याने अडचणी येत आहेत. सासवड, राजगड पोलिसांची देखील मदत घेण्यात येत असून, पोलिसांकडून आरोपींचा माग काढण्यासाठी प्रयत्न सुरू आहेत.
… कारागृहातील सराईतांकडे चौकशी
अनेकदा गुन्हेगारांकडूनच गुन्हेगारांची माहिती मिळते. त्याअनुषंगाने पोलिसांनी येरवडा कारागृहातील सराईत गुन्हेगारांची चौकशी करून माहिती घेतली. त्यांना संशयित आरोपींचे स्केच दाखविण्यात आले. त्यावरून आरोपींबाबत माहिती मिळविण्याचा प्रयत्न केला जात आहे.





