pune Gramin : गावडेवाडी जवळके घाटात भीषण अपघात; डंपर पलटी होऊन एक जण ठार, दोघेजण जखमी

मंचर : जवळके तालुका खेड येथून गावडेवाडी तालुका आंबेगाव येथील घाटात खडी वाहतूक करणाऱ्या दहा टायर डंपरचा मंगळवार दिनांक 3 रोजी दुपारी मोठा अपघात झाला असून या अपघात डंपरचालक जागीच ठार झाला असून इतर दोघेजण जखमी झाले आहेत.
अजय राजू मिर वय २१ मूळ रा. अंकलाव गुजरात, सध्या रा. नागापूर. आंबेगाव असे अपघातात मयत झालेल्या ड्रायव्हरचे नाव आहे. तर रुपेश भाऊसाहेब इंदोरे वय ४१ रा. अवसरी खुर्द ता. आंबेगाव व शेख बशीर नवाब वय ५० रा. मंचर ता. आंबेगाव असे जखमी झालेल्या दोघांची नावे आहेत. जखमींवर मंचर येथील खाजगी रुग्णालयात उपचार सुरू आहेत.
याबाबत अधिक माहिती अशी खडी वाहतूक करणारा डंपर एम एच ०४ जे के ७५२१ हा जवळके घाटात चढाला चढत नसल्याने डंपरची दुरुस्ती करण्यासाठी मंचर येथील फिटर शेख बशीर नवाब हे गेले होते. त्यावेळी डंपर दुरुस्ती करून तो घाटातून गावडेवाडी मार्गे घेऊन येत असताना डंपरमध्ये रुपेश भाऊसाहेब इंदोरे व शेख नवाब हे बसले होते.
तर अजय राजू मिर हा डंपर चालवत होता. त्यावेळी अचानक गाडीवरील ताबा सुटून डंपर रस्त्याच्या बाजूला पाच ते सहा पलटी मारून ५० फूट खोल दरीत जाऊन कोसळला. यात अजय राजू मिर हा जागीच ठार झाला आहे. मंचर येथील दोन क्रेनच्या साह्याने डंपर बाजूला काढण्यात आला असून जखमी रूपेश इंदोरे व शेख नवाब यांच्यावर उपजिल्हा रुग्णालय मंचर या ठिकाणी उपचार सुरू आहेत.
दरम्यान अपघातातील मयत अजय राजू मिर हे नागापूर ता. आंबेगाव या ठिकाणी राहत असून लाल गायांचा व्यवसाय करून ते कुटुंबाचा उदरनिर्वाह करतात. तसेच ड्रायव्हिंगचे कामही ते करत होते.या तरुणाचे मागे आई, वडील, दोन भाऊ, दोन बहिणी, पत्नी असा परिवार असून महिन्याभरापूर्वीच त्याच्या मुळ गावी त्याचा विवाह झाला होता. त्याच्या अपघाती निधनाने त्यांच्या कुटुंबावर दुःखाचा डोंगर कोसळला असून सर्वत्र हळहळ व्यक्त होत आहे.





