नवी दिल्ली -अनेक विरोधी पक्षांच्या नेत्यांनी अदानी उद्योग समूहाच्या गैरव्यवहारांच्या चौकशीच्या मागणीसाठी ईडीकडे धाव घेतली आहे. अदानींनी मनि लॉड्रिंग केले असून त्यांनी या प्रकरणाची चौकशी केली पाहिजे, अशी मागणी करणारे निवेदन कॉंग्रेस, दोन्ही कम्युनिस्ट पक्ष, संयुक्त जनता दल, शिवसेना ठाकरे गट, राजद, द्रमुक, आम आदमी पक्ष, केरळ कॉंग्रेस, झारखंड मुक्ती मोर्चा या पक्षांच्यावतीने ईडीला देण्यात आले आहे. ईडीचे संचालक एस. के. मिश्रा यांना ईमेल केलेल्या पत्रात, या पक्षांनी तपास एजन्सीला सांगितले की ” या प्रकरणात ते मागे फिरू शकत नाही आणि आपल्या अधिकारक्षेत्राचा त्यागही करू शकत नाहीत. तुम्हाला अदानीच्या गैरव्यवहाराची चौकशी करावीच लागेल. विरोधी पक्षांनी ईडीला निवेदन सादर करण्यासाठी ईडी कार्यालयावर मोर्चाही काढला होता. परंतु त्यांना पोलिसांनी विजय चौकात अडवले. ईडीला लिहिलेल्या पत्रात, विरोधी पक्षनेत्यांनी म्हटले आहे की, “अलीकडच्या काळात, ईडीने सेबी आणि सीबीआयसह पक्षपाताच्या प्रकरणांचा आवेशाने पाठपुरावा केला आहे याची आम्हाला जाणीव आहे. या पार्श्वभूमीवर आम्ही,अदानी समूहाने केलेल्या गैरव्यवहारावर त्वरीत कारवाई करावी. गेल्या तीन महिन्यांत अदानी समूहाविरुद्ध अनेक महत्त्वपूर्ण पुरावे उपलब्ध करून देण्यात आले आहेत.पण ईडीने त्यावर कोणतीच कार्यवाही केलेली नाही.