घोडगंगाचे शिवार तापले मांडवगण फराटा – घोडगंगा साखर कारखान्याच्या खर्चाने न्यायालयीन कामकाज चालविण्याचा अध्यक्षांना छंद आहे. करोना काळात दोन वर्षे न्यायालये बंद असतानाही कारखान्याचा 42 लाख रुपये कायदेविषयक खर्च झाला आहे. त्याची चौकशी करावी, अशी मागणी घोडगंगा साखर कारखान्याचे माजी उपाध्यक्ष दादा पाटील फराटे यांनी केली आहे. घोडगंगा किसान क्रांतीच्या वतीने शिरूर येथील पत्रकार परिषदेत फराटे यांनी टीकास्त्र सोडले. फराटे म्हणाले की, घोडगंगा साखर कारखान्याच्या विद्यमान संचालक मंडळाला यापूर्वी तीनदा मुदतवाढ मिळाली होती. परंतु तेव्हा कधी ते निवडणूका लवकर व्हाव्यात म्हणून कोर्टात गेले नाहीत. आता निवडणूक प्राधिकरणाची स्थगिती उठण्यासाठी बारा दिवस शिल्लक राहिलेले असताना लगेच प्राधिकरणाच्या निर्णयाला थेट उच्च न्यायालयात आव्हान दिले आहे. अध्यक्ष व प्रशासन निवडणूक लगेच होण्यासाठी आटापिटा का करीत आहेत. ऍड. सुरेश पलांडे म्हणाले, अतिवृष्टीमुळे सर्व सहकारी संस्थांच्या निवडणुका (दि.30) सप्टेंबरपर्यंत स्थगित होत्या. ही स्थगिती उठवावी, याकरिता काहींनी याचिका दाखल केली होती. संचालक मंडळाच्या निवडणुकीची उमेदवारी माघारीची मुदत असताना निवडणूक स्थगित झाली होती. वैधरित्या नामनिर्देशित उमेदवाराच्या यादी प्रसिद्ध झाली होती. माजी आमदार बाबूराव पाचर्णे हे वैध उमेदवाराच्या यादीत होते. याखेरीज घोडगंगा किसान क्रांती पॅनलचे ते प्रमुख त्याचबरोबर उमेदवार होते. नियमानुसार एखाद्या उमेदवाराचे निधन झाल्यास ती निवडणूक प्रत्यादेशीत करावी लागते. निवडणूक प्रत्यादेशीत झाल्याने निवडणुकीत नव्याने उमेदवारी अर्ज दाखल करता येतील. ज्यांनी उमेदवारी अर्ज मागे घेतले. त्यांना पुन्हा उमेदवारी अर्ज दाखल करता येणार नाही. पांडुरंग थोरात म्हणाले, घोडगंगा कारखान्याच्या उभारणीमध्ये माजी बाबूराव पाचर्णे यांचे महत्त्वपूर्ण योगदान होते. निवडणुकीच्या प्रक्रियेदरम्यान आमदार त्यांचे निधन झाल्याने त्या जागेची निवडणूक प्रक्रिया पुन्हा नव्याने घेण्याच्या निवडणूक प्रशासनाच्या निर्णयाविरोधात कारखान्याने उच्च न्यायालयात आव्हान दिले. त्या अवमानकारक याचिकेच्या पुष्ट्यर्थ पाचर्णे यांचा उल्लेख करणे निषेधार्ह आहे. यावेळी शिवसेनेचे तालुकाप्रमुख सुधीर फराटे, माजी संचालक ऍड. सुरेश पलांडे, पांडुरंग अण्णा थोरात, भाजपचे तालुकाध्यक्ष आबासाहेब सोनवणे, माजी सरपंच पांडुरंग दुर्गे, कैलास सोनवणे, काकासाहेब खळदकर, आत्माराम फराटे, गोविंद फराटे, सुरेश थोरात, प्रमोद दंडवते होते.