“फोन टॅपिंग’ प्रकरणात फडणवीसांची चौकशी करा – नाना पटोले

मुंबई – बेकायदा फोन टॅपिंग प्रकरणात पुण्याच्या माजी पोलीस आयुक्त रश्मी शुक्ला यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात आल्यानंतर या प्रकरणात तत्कालीन गृहमंत्री या नात्याने भाजपा नेते आणि माजी मुख्य मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या भूमिकेची चौकशी करण्याची मागणी कॉंग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी केली आहे.
फोन टॅपिंगसाठी गृह सचिवांची परवानगी बंधनकारक आहे, अशी सुप्रीम कोर्टाची असतानाही आमचे फोन बेकायदा टॅप केल्याप्रकरणात तत्कालीन गृहमंत्र्यांचाही हात असण्याची शक्यता आहे. तत्कालीन गृहमंत्री या नात्याने फडणवीस यांच्या भूमिकेचीही चौकशी झाली पाहिजे, असे ट्विट पटोले यांनी केले. सर्वोच्च न्यायालयाच्या या संदर्भातील सूचनांचे माहितीपत्रक आपल्या ट्वीटमध्ये जोडले आहे.
कायदेशीर माहिती घेऊन कारवाई करू – गृहमंत्री वळसे पाटील
रश्मी शुक्ला यांनी ज्या फोन टॅपिंगसाठी परवानगी घेतली, त्यामध्ये व्यक्तींची नावे बदलून दुसऱ्या नावांची परवानगी घेण्यात आली. ज्यामध्ये नाना पटोले – अमजद खान, बच्चू कडू – निजामुद्दीन बाबू शेख, संजय काकडे – तरबेज सुतार, आशिष देशमुख – रघु चोरगे अशी नावे देण्यात आली. सखोल चौकशी केल्यानंतरच रश्मी शुक्ला यांच्यावर कारवाई करण्यात आली आहे.
कोणत्याही लोकप्रतिनिधी अथवा सरकारी अधिकाऱ्याने आपल्या जबाबदारीचे भान न ठेवता चुकीच्या पद्धतीने कृती केली तरी त्या व्यक्तीला शासनाच्या नियमाप्रमाणे शिक्षा केली जाते. रश्मी शुक्ला या सध्या सेंट्रल डेप्युटेशनवर कार्यरत असल्याने त्यांच्या संदर्भात नेमकी काय कारवाई करण्यात येईल याची कायदेशीर माहिती घेऊन कारवाई करू, असे गृहमंत्री दिलीप वळसे-पाटील यांनी सांगितले.





