विज्ञानविश्‍व: ब्ल्यू मून लॅंडरची स्वारी

डॉ. मेघश्री दळवी

जेफ बेझोस हा अब्जाधीश तुम्हाला ऍमेझोन या कंपनीमुळे माहीत असेल. पण त्याचे इतर अनेक उद्योग आहेत आणि त्यातला एक आहे, ब्ल्यू ओरिजिन. गेल्या काही वर्षांमध्ये खासगी अवकाश कंपन्या सुरू झाल्या आहेत, त्यातली ब्ल्यू ओरिजिन ही एक मोठी कंपनी. चंद्रावर यान पाठवण्याच्या आपल्या महत्त्वाकांक्षी योजनेचा तपशील तिने या महिन्यात जाहीर केला आहे.

अवकाशात मानवाचे पाऊल पुढे न्यायचे या कल्पनेने बेझोस झपाटलेला आहे. म्हणूनच कंपनीचे नाव आहे, ब्ल्यू ओरिजिन. निळ्याशार पृथ्वीपासून सुरुवात करून अवकाशाला गवसणी घालणाऱ्या माणसाचे मूळ स्थान.
या कंपनीचे ब्ल्यू मून लॅंडर हे यान चंद्रावर उतरणार आहे ते एटकिन खोऱ्यात. चंद्राच्या दक्षिण ध्रुवाजवळ असणाऱ्या या खोऱ्याचे वैशिष्ट्य म्हणजे तिथे सर्वकाळ सूर्यप्रकाश मिळतो, तोही योग्य तितक्‍या प्रमाणात. चंद्राची एकच बाजू आपल्याला कायम दिसत असते, त्यामुळे तिथे दाहक प्रकाश असतो. तर दुसरी बाजू काळोखात असते. या दोघांच्या मध्यातला हा चिंचोळा पट्टा म्हणूनच वस्तीयोग्य आहे. या सूर्यप्रकाशाचा वापर करून तिथे सौर ऊर्जा मिळवता येईल. हा एटकिन खोऱ्याचा आणखी एक फायदा.

चंद्रावर जमिनीखाली बर्फाचे साठे असल्याचा शोध आपल्या भारताच्या चांद्रयानाने लावला, ते साठे उत्तर आणि दक्षिण ध्रुवाजवळ आहेत. प्रकाश, ऊर्जा आणि पाणी यांची सोय झाली तर माणसाच्या वस्तीकरता एटकिन खोरे उत्तम होईल यावर शास्त्रज्ञांचे एकमत आहे.

म्हणूनच ब्ल्यू मून लॅंडरची स्वारी असणार आहे एटकिन खोऱ्यावर. तिथे उतरून वस्तीची पूर्वतयारी सुरू करण्याचा बेझोसचा मानस आहे. या खोऱ्यात अनेक सुप्रसिद्ध विवरं आहेत. त्यातल्या शॅकलटन या सुमारे 20 किमी रुंदीच्या विवरात ब्ल्यू मून लॅंडर उतरणार आहे. अलीकडे चीनचे चांगं-4 हे यान जवळच्या वॉन कारमान या विवरात उतरले होते. अपोलो, श्रॉडिंजर ही विवरंदेखील त्याच परिसरात आहेत.

अर्थात तिथे वस्ती करायची तर त्यासाठी लागणारी सामग्री तिथेच मिळवायला लागेल. त्या दृष्टीने तिथे खाणी सुरू होतील. चंद्रावर ऍल्युमिनियम, लोखंड, मॅग्नेशियम आणि सिलिकॉन भरपूर आहे. प्लॅटिनमसारखे इतर मौल्यवान धातूही आहेत. आऊटर स्पेस ट्रीटी या 1967 च्या करारानुसार चंद्रावर कोणीही जाऊन वस्ती करू शकतो, मात्र केवळ शांततामय मार्गाने. त्यात बदल होत नाही तोवर तिथले खनिज सर्वांना उपलब्ध आहे. त्यामुळे ब्ल्यू ओरिजिनची ही योजना नफ्यात देखील जाऊ शकते.

ब्ल्यू मून लॅंडर साडेतीन टनापर्यंत सामान वाहून नेऊ शकते. पुढच्या टप्प्यात हे प्रमाण साडेसहा टन होईल अशी अपेक्षा आहे. द्रवरूप हायड्रोजन आणि ऑक्‍सिजन यांचा इंधन म्हणून वापर होईल. पुढे चंद्रावर वस्ती झाली, की अशी यानं परतीच्या प्रवासासाठी लागणारा हायड्रोजन चंद्रावर भरून घेईल ही कल्पना त्यामागे आहे. या मोहिमेला नासाने सहकार्य दिलेले आहे आणि पुढेही नासा खासगी कंपन्यांबरोबर काम करायला उत्सुक आहे हे महत्त्वाचे. ब्ल्यू मून लॅंडरच्या अवकाश भरारीची निश्‍चित तारीख अजून जाहीर व्हायची आहे.

You might also like

Leave A Reply

Your email address will not be published.