Pune District : खासगी कंपन्यांची इंटरनेट सेवा महागली

जांबूत : शिरुर तालुक्यातील बेट भागात भारत संचार निगम लिमिटेड कंपनीची सेवा सुरळीत करावी अशी मागणी परिसरातील ग्राहकांनी केली आहे. असंख्य कंपन्यांनी देशात आपली नेटवर्क सेवा उपलब्ध केली असली तरी देखील इंटरनेट आणि कॉलिंगसाठी वाढत्या महागाईचा फटका हा सर्वसामान्य ग्राहकांना बसत असून बीएसएनएलच्या परवडणाऱ्या सेवेकडे अनेक ग्राहक आकर्षित झाल्याचे दिसून येत आहे.
काठापूर खुर्द, पिंपरखेड, जांबूत, शरदवाडी, वडनेर खुर्द, चांडोह, फाकटे, टाकळी हाजी, माळवाडी आदी गावांत बीएसएनएलची सेवा वापरण्यासाठी पुरेसे नेटवर्क उपलब्ध होत नसल्याने याबाबत ग्राहकांमध्ये नाराजी दिसून येत आहे. तसेच या भागात मोठ्या प्रमाणात बँका, पतसंस्थासह विविध सहकारी संस्था आणि शाळा महाविद्यालयात मोठी इंटरनेट सेवेची गरज भासत आहे.
वाढत्या रिचार्जचा फटका इतर ग्राहकांना देखील होत असल्याने बीएसएनएलची सेवा वापरण्याकडे या भागातील ग्राहकांचा कल दिसून येतो. मात्र, अपुऱ्या नेटवर्कमुळे इंटरनेट सेवा नेहमीच विस्कळीत होत असल्याने यावर उपाययोजना केल्यास ग्राहकवाढीसाठी याचा फायदा होणार आहे. सर्वसामान्यांना परवडणाऱ्या दरात सेवा वापरणे सोयीचे ठरणार आहे.





