YCM Hospital: वायसीएम रुग्णालयात डिजिटल पेमेंटला इंटरनेटचा ‘खो’
YCM Hospital: स्मार्ट सिटीचे राऊटर धूळ खात, रुग्णांचे हाल

पिंपरी – पिंपरी चिंचवड महापालिकेच्या यशवंतराव चव्हाण स्मृती (वायसीएम) रुग्णालयात सुरू करण्यात आलेली बहुचर्चित डिजिटल पेमेंट व्यवस्था इंटरनेटअभावी कोलमडली आहे.
केंद्र सरकारच्या ‘डिजिटल इंडिया’ उपक्रमांतर्गत महापालिकेच्या इतर सर्व विभागांनी ऑनलाइन व्यवहारांची गती पकडली असली, तरी गरिबांची ‘लाइफलाइन’ समजल्या जाणाऱ्या वायसीएम रुग्णालयातील कॅशलेस व्यवहार मात्र संथ नेटवर्कमुळे ठप्प झाले आहेत. परिणामी, तातडीच्या उपचारासाठी येणाऱ्या रुग्ण आणि त्यांच्या नातेवाईकांना नाहक मनस्ताप सहन करावा लागत आहे.
महापालिकेच्या करसंकलन, पाणीपुरवठा, बांधकाम आणि आकाशचिन्ह विभागांत डिजिटल पेमेंट सेवा सुरळीत सुरू झाली आहे. मात्र वैद्यकीय विभागाने बराच काळ या व्यवस्थेकडे पाठ फिरवली होती. वायसीएम रुग्णालयात दररोज हजारो रुग्ण उपचारासाठी येतात. येथे रोख व्यवहारांमुळे सुट्या पैशांवरून रुग्ण आणि खिडकीवरील कर्मचाऱ्यांमध्ये रोज खटके उडत होते.
रोख रकमेच्या हाताळणीत गैरव्यवहार झाल्याचेही काही प्रकार उघडकीस आले होते. या सर्व प्रकारांना आळा घालण्यासाठी आणि पारदर्शकता आणण्यासाठी अखेर रुग्णालयात डिजिटल पेमेंट स्वीकारण्याचा निर्णय घेण्यात आला. त्यासाठी पेमेंट करणाऱ्या मशिनही उपलब्ध करून देण्यात आल्या आहेत. मात्र, योग्य तांत्रिक नियोजनाअभावी हा चांगला उपक्रम इंटरनेट अभावी अडकला आहे.
इमारतीत नेटवर्क गुल; कर्मचाऱ्यांचीही धावपळ
वायसीएम रुग्णालयाच्या मुख्य इमारतीमध्ये सर्वच प्रमुख मोबाइल कंपन्यांच्या नेटवर्कची मोठी अडचण आहे. मोबाइलला रेंजच मिळत नसल्याने रुग्ण आणि त्यांच्या नातेवाइकांचे ऑनलाइन पेमेंट सतत अडकतात (फेल होतात). कित्येकदा रुग्णांच्या खात्यातून पैसे कापले जातात, पण रुग्णालयाच्या खात्यात ते जमा होत नाहीत, ज्यामुळे वाद निर्माण होत आहेत. नेटवर्क नसल्यामुळे रुग्णालयाच्या कर्मचाऱ्यांनाही महत्त्वाच्या कामासाठी फोन करायचा असल्यास थेट इमारतीच्या बाहेर यावे लागते.
स्मार्ट सिटीचे राऊटर ठरले शोभेचे बाहुले
या समस्येवर मात करण्यासाठी महापालिकेने ‘स्मार्ट सिटी’ प्रकल्पांतर्गत रुग्णालयात ठिकठिकाणी वाय-फाय राऊटर्स बसवले होते. मात्र, हे राऊटर्स केवळ शोभेच्या वस्तू ठरले असून ते सध्या पूर्णपणे बंद अवस्थेत आहेत. त्यामुळे रुग्णालयात कोट्यवधी रुपये खर्चून उभारलेली अत्याधुनिक डिजिटल प्रणाली केवळ इंटरनेट नसल्यामुळे निष्प्रभ ठरली आहे. हे राऊटर पुन्हा सुरू करावे, असे पत्र रुग्णालय प्रशासनाने संगणक विभागाला यापूर्वीच दिले आहे. मात्र त्यावर काहीच कार्यवाही झालेली नाही.
कर्मचारी महासंघाच्या मेडिकलची ‘कसरत’
वायसीएम रुग्णालयाच्या आवारात कर्मचारी महासंघाचे मेडिकल स्टोअर आहे. तेथे डिजिटल पेमेंट स्वीकारण्यासाठी स्वतःच्या पातळीवर इंटरनेटची व्यवस्था केली आहे. औषधे खरेदी करणाऱ्या ग्राहकांना तात्पुरता वायफाय पासवर्ड दिला जातो. मात्र, त्याचा गैरवापर होऊ नये म्हणून कर्मचाऱ्यांना वारंवार पासवर्ड बदलावा लागत असून ही कसरत नेहमीचीच झाली आहे.
रुग्णांच्या नातेवाइकांची मागणी
सध्याच्या डिजिटल युगात आणि विशेषतः रुग्णालयासारख्या संवेदनशील ठिकाणी इंटरनेटअभावी रुग्णांची होणारी गैरसोय अत्यंत गंभीर बाब बनली आहे. प्रशासनाने देयकांचे वाद तातडीने मिटवून १०० एमबीपीएस क्षमतेचे इंटरनेट सुरू करावे, अशी जोरदार मागणी रुग्णांच्या नातेवाईकांकडून होत आहे.
‘आमची वाय-फाय सेवा सध्या बंद आहे. पूर्वी रुग्णालयात केवळ २ एमबीपीएस (Mbps) क्षमतेची सेवा सुरू होती. मात्र वाढत्या गरजेनुसार आता किमान १०० एमबीपीएस क्षमतेची सेवा आवश्यक आहे. पूर्वीच्या सेवेत काही तांत्रिक अडथळे आले होते, तसेच पुरवठादार कंपनीसोबत काही देयकांचे (बिलांचे) वाद झाल्यामुळे ही सेवा सुरळीत सुरू राहू शकली नाही. ही सेवा अद्ययावत करून पुन्हा सर्वांसाठी लवकरात लवकर सुरू करण्याचा आमचा प्रयत्न सुरू आहे.’ — किरणराज यादव, सह मुख्य कार्यकारी अधिकारी, स्मार्ट सिटी.
Pune District : जिल्ह्यात चाऱ्यासाठी ऊसक्षेत्र आरक्षित करा





