DMS System : इंटरनेटचे बिल थकवले; महापालिकेची डीएमएस यंत्रणा पुन्हा ठप्प!
सेवा पुरवठादार कंपनीच्या निष्काळजीपणाचा फटका प्रशासकीय कामकाजाला; ई-ऑफिसचा कारभार विस्कळीत

पिंपरी – पिंपरी चिंचवड महापालिकेची ई-ऑफिस प्रणाली अर्थात डॉक्युमेंट मॅनेजमेंट सिस्टीम (डीएमएस) पुन्हा एकदा विस्कळीत झाली आहे. डीएमएस सेवा पुरविणाऱ्या संबंधित कंपनीने इंटरनेट सेवेचे बिल थकविल्याने इंटरनेट पुरवठा बंद करण्यात आला आहे.
परिणामी, डीएमएस यंत्रणेच्या कामकाजावर परिणाम झाला असून महापालिकेतील ऑनलाइन प्रशासकीय कामकाजाचा खोळंबा होत आहे. कोट्यवधी रुपये खर्च करून उभारलेल्या यंत्रणेच्या देखभाल आणि संचालनाबाबतच प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे.
महापालिकेच्या विविध विभागांमधील पत्रव्यवहार, ई-टपाल, कागदपत्रांचे व्यवस्थापन आणि फाइल प्रक्रिया ऑनलाइन करण्यासाठी डीएमएस प्रणाली विकसित करण्यात आली आहे. प्रशासकीय कामकाज गतिमान आणि पारदर्शक करण्याच्या उद्देशाने ही यंत्रणा सुरू करण्यात आली.
मात्र, गेल्या काही काळापासून ही प्रणाली वारंवार तांत्रिक अडचणींचा सामना करत आहे. काही दिवसांपूर्वी मुसळधार पावसामुळे वीजपुरवठा खंडित झाल्याने ही यंत्रणा तब्बल दहा दिवस बंद होती. त्यानंतर दुरुस्ती करून ती सुरू करण्यात आली होती. आता पुन्हा इंटरनेट सेवेअभावी प्रणाली विस्कळीत झाली आहे.
विशेष म्हणजे, डीएमएस सेवा पुरविणाऱ्या कंपनीकडून इंटरनेट सेवेचे बिल वेळेत अदा करण्यात आले नसल्याने संबंधित इंटरनेट सेवा पुरवठादाराने सेवा बंद केली आहे. त्याचा थेट परिणाम महापालिकेच्या डीएमएस प्रणालीवर झाला आहे. एका सेवा पुरवठादार कंपनीच्या आर्थिक व्यवहारातील हलगर्जीपणामुळे महापालिकेचे महत्त्वाचे प्रशासकीय कामकाज अडचणीत आले आहे.
डीएमएस प्रणाली बंद किंवा विस्कळित झाल्याने अधिकारी आणि कर्मचाऱ्यांना ऑनलाइन फाइल हाताळणी, कागदपत्रांची देवाणघेवाण तसेच विविध प्रशासकीय प्रक्रिया पूर्ण करताना अडचणी येत आहेत. यामुळे कामकाजाचा वेग मंदावण्याबरोबरच प्रलंबित कामांचा भार वाढण्याची शक्यता आहे. नागरिकांशी संबंधित कामांवरही त्याचा परिणाम होऊ शकतो.
यापूर्वीही डीएमएस यंत्रणा बंद पडल्याच्या प्रकारानंतर संबंधित कंपनीला नोटीस बजावून कारवाई करण्याचे आश्वासन स्मार्ट सिटी प्रशासनाकडून देण्यात आले होते. मात्र, त्यानंतरही यंत्रणेतील अडचणी कायम असल्याने देखभाल आणि सेवा पुरवठ्याबाबत प्रशासन किती गंभीर आहे, असा प्रश्न उपस्थित होत आहे.
कोट्यवधींचा खर्च करून उभारलेली यंत्रणा वारंवार बंद पडत असेल, तर या प्रकल्पाचा उपयोग काय, असा सवालही उपस्थित केला जात आहे. आता इंटरनेट बिल थकबाकीमुळे उद्भवलेल्या या प्रकाराची जबाबदारी निश्चित करून संबंधित कंपनीवर कारवाई होणार का, तसेच डीएमएस प्रणाली विनाअडथळा सुरू ठेवण्यासाठी कायमस्वरूपी उपाययोजना केली जाणार का, याकडे महापालिका अधिकारी आणि कर्मचाऱ्यांचे लक्ष लागले आहे.
‘डीएमएस प्रणाली गेल्या चार – पाच महिन्यांपासून सातत्याने ठप्प होत आहे. ही सेवा पुरविणारी जी कंपनी आहे, तिने इंटरनेटचे बिल थकवले असल्याची माहिती समोर आले आहे. त्यामुळे संबंधित कंपनीने इंटरनेट पुरवठा बंद केला आहे. त्याचा परिणाम, महापालिकेच्या डीएमएस यंत्रणेवर झाला आहे. त्यामुळे महापालिकेचे कामकाज ठप्प होत आहे.’ – सुलभा उबाळे, नगरसेविका, शिवसेना
कोट्यवधींचा खर्च, तरीही यंत्रणा बेभरवशाची!
– ई-ऑफिस प्रणालीसाठी महापालिकेने कोट्यवधी रुपये खर्च केले.
– यापूर्वी पावसामुळे वीजपुरवठा खंडित झाल्याने दहा दिवस प्रणाली बंद होती.
– दुरुस्तीनंतर पुन्हा इंटरनेट सेवेअभावी कामकाज विस्कळीत.
– सेवा पुरवठादार कंपनीने इंटरनेटचे बिल थकविल्याने सेवा बंद.
– वारंवारच्या बिघाडामुळे प्रशासकीय कामकाजावर परिणाम.
‘टेक एम या कंपनीकडून आपण सेवा घेत आहोत. या कंपनीने इंटरनेटचे बिल द्यायचे आहे. इंटरनेटची व्हॅलिडीटी डिसेंबर अखेर आहे. सध्या संथगतीने यंत्रणा सुरू आहे, मात्र ती ठप्प झालेली नाही.’ – किरणराज यादव, उपमुख्य कार्यकारी अधिकारी, स्मार्ट सिटी.





