इफ्फीमध्ये अंतरराष्ट्रीय चित्रपटांच्या दिग्दर्शकांनी मांडले आपले अनुभव

पणजी – ज्यांना स्वतंत्र चित्रपट निर्मिती करायची आहे त्यांनी सरकारी निधीपासून दूर रहावे, असे मत ‘सन मदर’ या इराणी चित्रपटाच्या दिग्दर्शक महनाझ मोहम्मदी यांनी व्यक्त केला आहे. गोव्यातील पणजी येथे आयोजित 50व्या इफ्फी महोत्सवात त्या पत्रकार परिषदेत बोलत होत्या.
या परिषदेत ‘आय एम गोन्ना टेल गॉड एव्हरिथिंग’ या चित्रपटाचे दिग्दर्शक डेव पिन्न, ‘द अदर हाफ’ चित्रपटाचे निर्माते ॲल्यू डेनिए सुबोधी थेरो आणि ‘द फोर्थ वॉल’ चित्रपटाचे दिग्दर्शक झँग चाँग उपस्थित होते.
सिरीयामध्ये 2011 ते 2018 दरम्यान घडलेल्या सत्य घटनांवर आधारीत आपला चित्रपट असल्याचे डेव पिन्न यांनी सांगितले. आगामी काळात अमेरिकेतील गन कल्चरवर चित्रपट करण्याचा आपला विचार असल्याचे ते म्हणाले. कला आणि चित्रपट यांचा उपयोग मानवी जीवनात परिवर्तन घडवण्यासाठी आणि मानवी मूल्ये वृद्धींगत करण्यासाठी होऊ शकतो, असे मत सुबोधी यांनी व्यक्त केले. भारतीय चित्रपट चीनमध्ये अत्यंत लोकप्रिय असल्याचे ‘झँग चाँग’ यांनी यावेळी सांगितले. भारतीय अभिनेते अमीर खान यांचे अनेक चाहते चीनमध्ये असल्याचे त्यांनी सांगितले.





