लक्षवेधी : युद्धाचा सोन्यावरील परिणाम

– हेमंत देसाई
इराणच्या अणुतळांवर अमेरिकेने केलेल्या हल्ल्यांमुळे डॉलरमधली गुंतवणूक वाढली आहे. डॉलर मजबूत झाल्यामुळे सोन्याच्या भावांवर परिणाम झाला आणि सोन्याची चमक कमी झाली.
ज्यावेळी आंतरराष्ट्रीय बाजार अनिश्चित लाटांवर हेलकावे खात असतो, त्यावेळी शेअर बाजाराप्रमाणे कमॉडिटी बाजारभावांवरदेखील त्याचा परिणाम होत असतो. इस्रायल विरुद्ध इराण हे 12 दिवसांचे घनघोर युद्ध सुरू असताना, शेअर बाजार आपटला आणि सेन्सेक्स 900 अंशांनी भडकला! मात्र अजूनही रशिया-युक्रेन आणि इस्रायल विरुद्ध हमास ही युद्धे थांबलेली नाहीत
त्यामुळे वातावरण अस्थिरच आहे. जगातील मध्यवर्ती बँका येत्या बारा महिन्यांच्या कालावधीत सुवर्णसाठ्यात वाढ करत राहतील, असा अंदाज ‘जागतिक सुवर्ण परिषदे’ने व्यक्त केला असून, तो पटण्यासारखाच आहे. वर्ष 2025च्या ‘सेंट्रल बँक्स गोल्ड रिझर्व्ह’ या अहवालानुसार 43% मध्यवर्ती बँका पुढील वर्षात त्यांच्या सोन्याच्या साठ्यात भर घालण्याची योजना आखत आहेत.
दीर्घकालीन मूल्याच्या साठवणुकीसाठी, गुंतवणुकीत वैविध्य आणण्यासाठी आणि संकटकाळात चांगला रिटर्न मिळावा अशा तीन प्रमुख कारणांमुळे सोने खरेदीला प्राधान्य दिले जात असते. सध्या सुरू असलेल्या जगातील राजकीय घडामोडींमुळे अर्थव्यवस्था ताणाखाली येत आहे. अनेक देशांची निर्यात कमी होत आहे. जगातील दळणवळण आणि आयात-निर्यात व्यापार कमी झाला आहे.
म्हणूनच सुरक्षित गुंतवणुकीचे साधन म्हणून सोने खरेदीला प्राधान्य दिले जात आहे. उदयोन्मुख आणि विकसनशील अर्थव्यवस्थांमधील मध्यवर्ती बँकांनी सोन्याच्या विक्रमी किमती आणि सलग पंधरा वर्षांच्या खरेदीच्या पार्श्वभूमीवरदेखील, सोन्याबद्दलचा आपला आशादायक दृष्टिकोन कायम ठेवला आहे.
वेगवेगळ्या देशांतील मध्यवर्ती बँकांनी त्यांच्याकडे सोन्याचा साठा वाढवत नेला असून, 2024 मध्ये त्यात एकत्रित अशी 41 टक्के वाढ झाली आहे. सोन्याच्या किमतीने 2025 मध्ये उच्चांकी पातळी गाठली आहे. व्याजदरात टप्प्याटप्प्याने होणारी घट आणि भाववाढ यामुळे सोन्या-चांदीत गुंतवणूक करण्याचा कल वाढत आहे, हे लक्षात घेतले पाहिजे.
रविवारी 22 जून रोजी युद्धविरामाची घोषणा अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी केली (मात्र युद्ध थांबले नाही) आणि त्याबरोबर भारतातील वायदे बाजारात एमसीएक्सवर सोन्यात 1,226 रुपयांची घसरण झाली. सोने दहा ग्रॅमला 98,162 पोहोचले, तर चांदीत 793 रुपयांची घसरण होऊन ती 1,05,966 रुपये प्रति किलोवर आली! युद्ध सुरू राहिले असते, तर सोन्या-चांदीचे भाव वाढले असते.
इराणच्या अणुतळांवर अमेरिकेने केलेल्या हल्ल्यांमुळे डॉलरमधली गुंतवणूक वाढली आहे. डॉलर मजबूत झाल्यामुळे सोन्याच्या भावांवर परिणाम झाला आणि सोन्याची चमक कमी झाली. पण गेल्या पाच महिन्यांत सोन्याच्या भावात भारतात वाढ झाली आहे.
गेल्या सलग चार महिन्यांत भारतात किरकोळ भाववाढीच्या दरात नरमाई दिसून आली. परंतु ‘कोर इन्फ्लेशन’, म्हणजेच मुख्य चलनवाढीचा दर वधारतच आहे. अशावेळी अनियमितपणे चढ-उतार होत राहणार्या अन्न आणि ऊर्जा घटकांप्रमाणेच, सोन्यालाही या मुख्य चलनवाढीच्या मापनातून वगळले जावे, अशी सूचना ‘क्रिसिल’ या पतमापन संस्थेने केली आहे.
मे 2025 मध्ये किरकोळ महागाईचा दर 75 महिन्यांच्या काळातील सर्वात कमी म्हणजे 2.8% इतका होता. परंतु मागच्या चार महिन्यांत ऊर्जा व अन्नघटक यांच्या किमतींचा अपवाद करता मुख्य चलनवाढीचा दर चार टक्क्यांच्या पातळीवर राहिला आहे. मे 2024 ते मे 2025 या वर्षभरात मुख्य चलनवाढ 111 आधारबिंदूंनी, म्हणजेच 1.1 टक्क्याने वाढून, ती 4.2 टक्क्यांवर पोहोचली आहे. मागच्या दशकभरातील तुलनेत ही वाढ खूपच कमी आहे.
परंतु किरकोळ महागाई हळूहळू का होईना, वाढत आहे. जेव्हा मुख्य चलनवाढ होते तेव्हा अर्थव्यवस्थेतील देशांतर्गत मागणी मजबूत होत असल्याचे अधोरेखित होते. परंतु अलीकडील वाढ ही देशातील अंतर्गत घटकांपेक्षा जागतिक आर्थिक स्थितीशी संबंधित आहे, असे क्रिसिलने म्हटले आहे आणि ते योग्यच आहे.
ग्राहक किंमत निर्देशांकात सोन्याचा भारांक एकूण निर्देशांकाच्या 1.1% इतकाच आहे. परंतु मुख्य चलनवाढीत सोन्याचा समावेश असल्याने, देशांतर्गत किंमतवाढीबाबतचे संकेत त्यामुळे बिघडू शकतात, असे क्रिसिलचे मत आहे. त्यामुळे सोन्याची तेजी किरकोळ महागाईच्या मापनात मोजली जाऊ नये, असे या संस्थेचे मत आहे. पण जगातील प्रमुख मध्यवर्ती बँकांच्या कोर निर्देशांकात सोन्याचा समावेश हा असतोच.
अर्थात त्याचे भारमान कमी असल्यामुळे कोर चलनवाढीच्या मापनावर त्याचा परिणाम सीमितच राहतो. परंतु इतर देशांच्या तुलनेत सोन्याला भारतात मागणी अधिक असल्याने, त्याचा निर्देशांकातील वाटाही जास्त आहे आणि त्यातून कोर निर्देशांकाबाबत गैरसमज पसरवणारे संकेत दिले जातात, असे क्रिसिलचे मत आहे. मात्र तरी देखील बँक ठेवी, समभाग, कर्जरोखे यांच्याप्रमाणेच सोन्यामध्येदेखील काही प्रमाणात गुंतवणूक करणे, हे श्रेयस्करच असते, हे ध्यानात ठेवले पाहिजे.





