एप्रिलमध्ये व्याजदर कपात शक्य; किरकोळ महागाई दर 3.61 टक्क्यांवर घसरला

नवी दिल्ली – फेब्रुवारी महिन्यात भाजीपाला आणि प्रोटीनयुक्त पदार्थाच्या किमती मोठ्या प्रमाणात कमी झाल्या. त्यामुळे किरकोळ किमतीवर आधारित महागाईचा दर केवळ 3.61% इतका नोंदला गेला आहे. रिझर्व बँकेने महागाई 4% च्या आत रोखण्याचा संकल्प केला असतानाच या महागाईचा दर त्यापेक्षा कमी झाला आहे. त्यामुळे सरकार दरबारी समाधानाचे वातावरण निर्माण झाले आहे. एप्रिल महिन्यातील पतधोरणात रिझर्व बँक यामुळे व्याजदरात आणखी कपात करण्याची शक्यता खुली झाली आहे.
जानेवारी महिन्यात किरकोळ महागाईचा दर 4.26% तर 2024 च्या फेब्रुवारी महिन्यात किरकोळ महागाईचा दर 5.9% इतका होता. म्हणजे वार्षिक आणि मासिक पातळीवर महागाईचा दर कमी झाला आहे. फेब्रुवारी महिन्यात अन्नधान्याच्या महागाईचा दर तब्बल 2.22 टक्क्यांनी कमी झाला आहे. मे 2023 नंतर प्रथमच फेब्रुवारी महिन्यात महागाईचा दर किमान पातळीवर आला आहे.
केंद्र सरकारने रिझर्व बँकेला महागाई चार टक्क्याच्या आत रोखण्याची सूचना केलेली आहे. गेल्या दोन वर्षात हा दर चार टक्क्यापेक्षा जास्त होता. मात्र महागाईचा दर कमी होण्याची शक्यता रिझर्व बँकेला वाटत होती. त्यामुळे रिझर्व बँकेने गेल्या महिन्यात रेपो या आपल्या मुख्य व्याजदरात पाव टक्के कपात केली होती. महागाई आणखी कमी होऊन 4% च्या खाली आली आहे. त्यामुळे एप्रिल मधील पतधोरणात आणखी पाव टक्के व्याजदर कपात होण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.
रिझर्व बँकेचे पतधोरण 9 एप्रिलला जाहीर होणार आहे. दुसर्या तिमाहीत विकासदर कोसळलेला आहे. अशा परिस्थितीत विकास दराला चालना देण्यासाठी व्याजदरात शक्य तितक्या लवकर कपात करावी अशी सरकारची इच्छा आहे. त्यासाठी पूरक महागाईची आकडेवारी उपलब्ध होत असल्यामुळे व्याजदर कपात होऊ शकते. तसे झाले तर सध्या ज्यांनी कर्ज घेतले आहे, त्यांच्या कर्जावरील हप्त्याच्या रकमेत कपात होईल. त्याचबरोबर नवीन कर्ज घेणार्यांना कमी व्याजदरावर कर्ज मिळेल. त्यामुळे अर्थव्यवस्था विस्तारू शकेल.
भाजीपाला, प्रोटीनयुक्त पदार्थ स्वस्त
फेब्रुवारी महिन्यात भाज्या आणि प्रोटीन युक्त पदार्थ स्वस्त झाले. त्यामुळे किरकोळ महागाई कमी होण्यास मदत झाली. या महिन्यामध्ये भाजीपाल्याबरोबरच अंडी, मांस, मासे, डाळी, दूध आणि दुग्धजन्य पदार्थाच्या किमती मोठ्या प्रमाणात कमी झाल्या. उन्हाळ्यात मांस आणि माशांचे सेवनाचे प्रमाण कमी होते. यामुळेया दोन घटकाच्या दरात घट झाली असल्याचे दिसून येते.





