RBI’s monetary policy: आरबीआयचे पतधोरण उद्या होणार जाहीर; व्याजदर कपात, भांडवल सुलभतेेच्या निर्णयाकडे लक्ष

मुंबई – शुक्रवारी रिझर्व बँकेचे पतधोरण जाहीर होणार आहे. शुक्रवारी दुसर्या तिमाहीचा विकासदर जाहीर होण्याअगोदर रिझर्व बँक निश्चित व्याजदर कपात करेल असे समजले जात होते. मात्र विकासदर तब्बल 8.2% इतका भरल्यानंतर बँक व्याजभरात कपात करेल की नाही याबद्दल विश्लेषक शंका व्यक्त करीत आहेत.
महागाई एक टक्क्यांपेक्षा कमी असली तरी रुपयाच्या अवमूल्यनामुळे आगामी काळात महागाई वाढण्याची शक्यता अधिक आहे. अशा परिस्थितीत महागाईच्या भविष्यातील आकडेवारीकडे लक्ष देऊन रिझर्व बँक व्याजदर कपात टाळेल की सध्याच्या कमी महागाईच्या आधारावर व्याजदर कपात करेल हा चर्चेचा मुद्दा ठरला आहे.
बरेच विश्लेषक रिझर्व बँक व्याजदर कपातीचा निर्णय घेईल असे सांगत आहेत. तर तितकेच विश्लेषक व्याजदर कपात टाळली जाईल असे सांगत आहेत. मात्र भांडवल सुलभतेच्या आघाडीवर पतधोरण समिती निश्चित उपाययोजना करण्याची शक्यता व्यक्त करण्यात येत आहे. गेल्या तीन पतधोरणात रिझर्व बँकेने आपला मुख्य व्याजदर रेपो 5.50% या पातळीवर कायम ठेवला आहे.
गेल्या पंधरवड्यात रिझर्व बँकेचे गव्हर्नर संजय मल्लोत्रा यांनी स्वतः महागाईची पातळी पाहिली असता व्याजदर कपातीची शक्यता खुली असल्याचे सांगितले होते. मात्र त्यानंतर विकासदर वाढल्याची आणि रुपया घसरल्याची आकडेवारी जाहीर झाली आहे. या बाबी पत धोरण समिती विचारात घेण्याची शक्यता आहे.
रिझर्व बँकेने महागाई चार टक्क्याच्या आत रोखण्याचे उद्दिष्ट ठरविले आहे. गेल्या अनेक महिन्यापासून ही महागाई एक टक्क्यापेक्षा कमी पातळीवर आहे. त्यामुळे बरेच विश्लेषक रिझर्व बँकेने या संधीचा फायदा घेऊन किमान एक वेळ व्याजदरात कपात करावी असे सुचवित आहेत.
पतधोरण समिती पूर्ण वर्षाच्या विकासदराचा अंदाज वाढविण्याची शक्यता आहे. सुरुवातीला विकासदराचा अंदाज 6.5% होता. ऑक्टोबर महिन्यामध्ये तो वाढवून 6.8% इतका करण्यात आला आहे. आता दुसर्या तिमाहीचा विकास दर 8.2 टक्के झाल्यामुळे शुक्रवारी रिझर्व बँक या अंदाजात आणखी वाढ करण्याची शक्यता मात्र निश्चित आहे.





