Inter University Kho-Kho Tournament (Women’s) : सावित्रीबाई फुले पुणे युनिव्हर्सिटी संघाला विजेतेपद…

Inter University Kho-Kho Tournament (Women’s) : महाराष्ट्रीय मंडळाचे चंद्रशेखर आगाशे शारीरिक शिक्षण महाविद्यालय, पुणे आणि सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठ यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित ‘अखिल भारतीय आंतर विद्यापीठ महिला खो-खो’ स्पर्धेत यजमान सावित्रीबाई फुले पुणे युनिव्हर्सिटी संघाने औरंगाबादच्या डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा युनिव्हर्सिटी संघाचा ६ गुणांनी (१७-११) पराभव करून विजेतेपद संपादन केले. सावित्रीबाई फुले पुणे युनिव्हर्सिटी संघाने २० वर्षांनी आंतर-विद्यापीठ स्पर्धेचे विजेतेपद मिळवले आहे.
महाराष्ट्रीय मंडळाच्या चंद्रशेखर आगाशे शारीरिक शिक्षण महाविद्यालय, मुकूंदनगर येथील मैदानावर झालेल्या अंतिम सामन्यात सावित्रीबाई फुले पुणे युनिव्हर्सिटीच्या काजल भोर (१.२०, १.३० मि., ६ गुण) आणि प्रियांका इंगळे (१.२०, २.५० मि., ४ गुण) यांनी अष्टपैलु खेळ करून संघाच्या विजयात मोलाचा वाटा उचलला. मध्यतरास पुणे विद्यापीठाकडे ३ गुणांची (८-५) आघाडी होती. डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा युनिव्हर्सिटी संघाकडून गौरी शिंदे (१.२०, ०.५० मि., ३ गुण) आणि जानव्ही पेठे (१.२०, १.४० मि., ३ गुण) यांनी चांगला खेळा केला.
स्पर्धेचे पारितोषिक वितरण अर्जुन पुरस्कार विजेते आणि जेष्ठ खो-खोपटू सुरेखा द्रविड, महाराष्ट्रीय मंडळाचे अध्यक्ष भुषण गोखले आणि महाराष्ट्रीय मंडळाचे सरचिटणीस रोहन दामले यांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी महाराष्ट्र खो-खो संघटनेचे कार्याध्यक्ष सचिन गोडबोले, प्रमुख पाहुणे अमरनाथ चक्रदेव, महाराष्ट्र खो-खो संघटनेचे सचिव अड. गोविंद शर्मा, सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाचे क्रीडा संचालक विष्णू पेठकर, क्रीडा सहसंचालक दत्ता महाजन, मुंबई विद्यापीठचे क्रीडा संचालक मोहन आमृळे, स्पर्धेचे सचिव डॉ. शिरीष मोरे आदि उपस्थित होते.
स्पर्धेतील सावित्रीबाई फुले पुणे युनिव्हर्सिटी संघाला आणि उपविजेत्या डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा युनिव्हर्सिटी संघाला करंडक देण्यात आला. स्पर्धेतील सर्वोत्कृष्ट खेळाडूचा मान सावित्रीबाई फुले पुणे युनिव्हर्सिटीच्या काजल भोर हिला देण्यात आला. सर्वोत्कृष्ट संरक्षकाचा मान सावित्रीबाई फुले पुणे युनिव्हर्सिटीच्या प्रियांका इंगळे आणि सर्वोत्कृष्ट आक्रमकाचा मान डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा युनिव्हर्सिटीच्या ऋतुजा खरे यांना मिळाला.



