Inter University Women’s Kho-Kho Tournament : सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाला विजेतेपद…

पुणे – मध्यप्रदेशातील सतना येथे पार पडलेल्या पश्चिम विभागीय आंतर विद्यापीठ महिला खो-खो स्पर्धेत सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाने सलग दुसऱ्यांदा वर्षी विजेतेपद पटकाविले. या स्पर्धेच्या पात्रता फेरीत पार पडलेल्या सामन्यात सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाने एसएनडीटी मुंबई संघाविरुद्ध १ डाव १३ गुणांनी विजय मिळवला.
सदर सामन्यात प्रियांका इंगळे, कोमल दारवटकर, काजल भोर यांनी विशेष कामगिरी केली. तसेच आरती लगड, श्वेता पासलकर, मनीषा पढेर यांनी सर्वोत्तम कामगिरी बजाविली. त्यानंतर साखळी फेरीत झालेल्या सामन्यात सूरत विद्यापीठ विरुद्ध सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाने १ डाव ५ गुणांनी विजय मिळवित शानदार कामगिरी केली. प्रियंका इंगळे व कोमल दारवटकर यांचे संरक्षण सर्वोत्तम होते तर काजल भोर यांनी आक्रमक खेळ केला.
त्यानंतर झालेल्या दुसऱ्या साखळी सामन्यात डॉ. बाबासाहेब आंबेडकर विद्यापीठ, संभाजीनगर संघा विरुद्ध सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाने ११ विरुद्ध ३ असा २ डाव ८ गुणांनी विजय मिळवला. या सामन्यात रुतिका राठोड, स्नेहा महाले हिचे आक्रमण सर्वोत्तम होते. तर प्रांजल मडकर, कोमल दारवटकरचे संरक्षण आणि प्रियंका इंगळे हिची अष्टपैलू कामगिरी ठरली.
शेवटच्या सामन्यात सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाने मुंबई विद्यापीठ विरुद्ध १ डाव १२ गुणांनी विजय मिळवित प्रथम क्रमांक मिळविला. या सामन्यात कोमल दारवटकर हिचे ३ मिनिटांचे संरक्षण तर प्रियांकाने ४ मिनिटे संरक्षण सर्वोत्तम ठरले. तिने ४ गडी आक्रमणात टिपले. आता या पुढील स्पर्धा अखिल भारतीय आंतर विद्यापीठ पुणे येथे १५ ते १८ फेब्रुवारी २०२४ या कालवधीत होणार आहेत.


