US and Iran War : होर्मूझवरील ताब्यासाठी अमेरिका-इराणमध्ये जोरदार स्पर्धा; दोन्ही देश झाले आक्रमक !
होर्मूझच्या सामुद्रधुनीवर आपलेच नियंत्रण असल्याचा दावा अमेरिका आणि इराण या दोन्ही प्रतिस्पर्धी देशांकडून सोमवारी करण्यात आला. गेला आठवडाभर दोन्ही देश एकमेकांवर याच मुद्द्यांवरून हल्ले करत होते.

US and Iran War – होर्मूझच्या सामुद्रधुनीवर आपलेच नियंत्रण असल्याचा दावा अमेरिका आणि इराण या दोन्ही प्रतिस्पर्धी देशांकडून सोमवारी करण्यात आला. गेला आठवडाभर दोन्ही देश एकमेकांवर याच मुद्द्यांवरून हल्ले करत होते. आता या मुद्द्यावरून दोन्ही देश अधिक आक्रमक झाले असून आता युद्धबंदीसाठीच्या वाटाघाटी यामुळे धोक्यात आल्या आहेत. इराणने रविवारी होर्मूझच्या सामुद्रधुनीमध्ये ओमानच्या किनाऱ्याजवळ एका कंटेनर जहाजावर हल्ला केला. या सागरी मार्गावर इराणचेच नियंत्रण राहिले पाहिजे, हा मुद्दा या हल्ल्यातून इराणने अधोरेखित केला.
होर्मूझमधीलसागरी वाहतूक आणि इतर काही मुद्द्यांचा तपशीलनिश्चित करण्यासाठी ६० दिवसांच्या वाटाघाटी करण्याचे अमेरिका आणि इराणने ठरवले होते. या ६० दिवसांपैकी जवळपास निम्मेदिवस उलटून गेले असले, तरी वाटाघाटींना अद्याप वेग आलेला नाही. उलट या कालावधीत होर्मूझवर भविष्यात कोणाचे नियंत्रण राहणार या मुद्द्यावरून एकमेकांवरचे हल्ले अधिकच वाढले आहेत. त्यामुळे इराणविरुद्धचे युद्ध पुन्हा सुरू होण्याची भीती जागतिक नेत्यांना वाटू लागली आहे. जर युद्ध पुन्हा सुरू झाले, तर त्याचे विनाशकारी परिणाम होतील, अशी शक्यता संयुक्त राष्ट्राचे सरचिटणीस ॲन्टनिओ गुटेरेस यांनी वर्तवली आहे.
होर्मूझची सामुद्रधुनी जागतिक व्यापारासाठीचा महत्वाचा मार्ग आहे. इराणचे त्यावर नियंत्रण नाही, असेही यूएस सेंट्रल कमांडने म्हटले आहे. होर्मूझची सामुद्रधुनी जशी युद्धापुर्वी खुली होती, तशीच ती आताही खुली राहिली पाहिजे. सागरी वाहतुकीचे स्वातंत्र्य अबाधित राहिले पाहिजे, असे युरोपीय संघाच्या परराष्ट्र धोरण प्रमुख काजा कल्लास यांनीही म्हटले आहे.
मात्र अमेरिकेचा दावा रिव्होल्युशनरी गार्डने सपशेल फेटाळला आहे. होर्मूझची सामुद्रधुनी आमची आहे. तेथे कोणत्याही बदमाशांनी किंवा लहान मुलांना मारणाऱ्या जगभरातील कोणत्याही देशाच्या लष्कराने बेकायदेशीरपणे हस्तक्षेप करू दिला जाणार नाही, अस रिवव्होल्युशनरी गार्डने म्हटले आहे. काल ओमानवर झालेल्या हल्ल्यांनंतर ओमान सरकारने इराणच्या राजदूतांना पाचारण करून या हल्ल्यांबद्दल निषेध नोंदवला.
इराणमधील डझनभर ठिकाणी अमेरिकेचे हल्ले
सोमवारी इराणच्या डझनभर ठिकाणांवर अमेरिकेने हल्ले केल्याचा दावा अमेरिकेच्या सेंट्रल कमांडने केला आहे. यावेळी इराणची संरक्षण यंत्रणा, रडार ठिकाणे, क्षेपणास्त्र आणि ड्रोन उपकरणांची ठिकाणे आणि लहान बोटींना लक्ष्य करण्यात आले. इराणमध्ये होर्मोझगान, खुझेस्तान आणि मारकाझी प्रांतांवर हल्ले झाले आणि या हल्ल्यात किमान दोनजण ठार झाले.
सिस्तान आणि बालुचेस्तान प्रांतातही असे हल्ले झाल्याचे इराणच्या सरकारी वृत्तसंस्थेने म्हटले आहे. इराणने अमेरिकी सैन्याला आश्रय देणाऱ्या प्रदेशातील राष्ट्रांवर हल्ला करून प्रत्युत्तर दिले, तसेच सामुद्रधुनीवर केवळ आपलेच नियंत्रण असले पाहिजे आणि त्यातून प्रवास करणाऱ्या जहाजांवर संभाव्यतः शुल्क आकारले पाहिजे, असा आग्रह धरला आहे.
आखातील देशांमध्ये इराणच्या हल्ल्यांचा धोका कायम
बहरीनमध्ये क्षेपणास्त्रांच्या हल्ल्यांची पूर्वसूचना देणारे सायरन तीनवेळा वाजवण्यात आले. कुवेतनेही इराणची क्षेपणास्त्रे हवेतच रोखल्याचा दावा केला आहे. इराणची चार क्षेपणास्त्रे पाडल्याचा दावा जॉर्डनच्या लष्कराने केला. पण या घटनेमुळे कोणतीही जीवित अथवा मालमत्तेची हानी झाली नसल्याचे जॉर्डनने म्हटले आहे.
रविवारी इराणने बहरीन, कुवेत, कतार, जॉर्डन आणि अगदी ओमानपर्यंत हल्ले केले होते. तर सोमवारी इराणमधील कुर्दिश विरोधी गट असलेल्या कुर्दिस्तान फ्रीडम पार्टीच्या इराकमधील तळावरही हल्ला झाला. या तळावरील चामशर तळावर हा हल्ला झाला, असे कुर्दिस्तान मिलिशिया कॉर्प्सने म्हटले आहे. या हल्ल्याची जबाबदारी देखील कोणीही घेतली नाही.





