Inspiring Story – पहाटेच्या बोचऱ्या थंडीत आई-वडील कचऱ्याच्या गाड्या ढकलत असताना, घराची जबाबदारी सांभाळत उजेड शोधणाऱ्या हातांनी आज यशाचे आभाळ कवेत घेतले. प्रतिकूल परिस्थिती, आर्थिक चणचण आणि समाजाचे पूर्वग्रह मोडीत काढत पुणे जिल्ह्यातील कचरावेचकांच्या मुला-मुलींनी बारावीच्या परीक्षेत घवघवीत यश संपादन केले आहे. कागद, काच, पत्रा कष्टकरी पंचायत संघटनेच्या मार्गदर्शनाखाली परीक्षा दिलेल्या विद्यार्थ्यांपैकी तब्बल ८० टक्के विद्यार्थी उत्तीर्ण झाले असून, त्यांच्या या यशाने वस्त्यांमध्ये आनंदाचे वातावरण आहे. या परीक्षेत कॉमर्स शाखेतून सर्वाधिक ७१, आर्ट्समधून २९ आणि सायन्स शाखेतून १३ विद्यार्थ्यांनी नशिब आजमावले होते. या यशात स्वच्छ संस्था आणि कष्टकरी पंचायतीने दिलेली शैक्षणिक मदत, वह्या-पुस्तके आणि विशेष शिकवणी वर्गांचा मोठा वाटा आहे. पंधराव्या वर्षी जिद्दीची मशाल कळस वस्तीत राहणाऱ्या मंगल गोविंद सकट यांची गोष्ट थक्क करणारी आहे. घरच्या परिस्थितीमुळे १५ वर्षांपूर्वी शिक्षण सुटले होते. सध्या त्या पतीसोबत फिरून कचरा वेचतात आणि दुपारी धुणी-भांडी करतात. शिक्षणाची ओढ कायम होती. पंचायतीच्या मदतीने त्यांनी १७ नंबरचा फॉर्म भरला, रात्री मासूमच्या वर्गात अभ्यास केला आणि वयाच्या या टप्प्यावर ६९ टक्के गुण मिळवून सर्वांना आश्चर्याचा धक्का दिला. खाकी वर्दीचे स्वप्न हडपसर भागात कचरा संकलनाचे काम करणाऱ्या अर्चना आणि शंकर कांबळे यांची मुलगी संध्या हिने कॉमर्स शाखेतून ८२.१७ टक्क्के गुणांची कमाई केली आहे. आपल्या आई-वडिलांच्या कष्टाचे चीज करण्यासाठी संध्याला आता पोलीस भरतीची तयारी करायची आहे. सावरलेली स्वप्ने याबरोबरच श्रुती लोंढे (७५%) हिने वडिलांच्या निधनानंतर बहिणीच्या मदतीने घरीच अभ्यास करून यश मिळवले. तिला आता आर्किटेक्ट व्हायचे आहे. वारजे येथील संगीता निर्मल (७४.८३%) हिने वडिलांच्या मृत्यूनंतर आईने घेतलेल्या कष्टाची परतफेड करत एम.बी.ए. करण्याचे ध्येय ठेवले आहे, तर कोथरूडच्या पूजा रावत (७२.८३%) हिने चिकाटीच्या जोरावर पोलीस होण्याचे स्वप्न पाहिले आहे.