Crime : पुणे जिल्ह्यातील घरफोडी-चोरी प्रकरणांचा उलगडा; 3 आरोपी अटकेत, 46 लाखांचा मुद्देमाल जप्त
Crime

Crime : नारायणगाव – पुणे जिल्ह्यातील जुन्नर, आंबेगाव तसेच इतर तालुक्यांमध्ये जबरी चोरी, चेन स्नॅचिंग आणि घरफोडीचे गुन्हे करणाऱ्या दोन सराईत टोळ्यांचा पर्दाफाश करण्यात पोलिसांना यश आले आहे. या कारवाईत तीन आरोपींना अटक करण्यात आली असून, त्यांच्या ताब्यातून सुमारे ४६ लाख रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे.
अटक करण्यात आलेल्या आरोपींमध्ये हर्षल दत्तात्रय तांदळे (वय २५) आणि महेश दत्तात्रय मंगळवेढेकर (वय २५) दोघेही राहणार मंचर, ता. आंबेगाव यांना गुरुवारी (दि.१६) पारगाव पोलीस स्टेशन हद्दीतील पोंदवाडी फाटा परिसरातून ताब्यात घेण्यात आले. तसेच इतर गुन्ह्यातील आरोपी पियुष बिरम नानावत (वय १९, रा. सांगेशी, कामशेत, ता. मावळ) यालाही पोलिसांनी अटक केली आहे.या आरोपींकडून एकूण २३ गुन्हे उघडकीस आले असून, चोरीस गेलेले सुमारे ३२ तोळे सोन्याचे दागिने आणि इतर मुद्देमाल असा एकूण अंदाजे ४६ लाख रुपयांचा ऐवज हस्तगत करण्यात आला आहे.
पुणे ग्रामीणचे पोलीस अधीक्षक संदीप सिंह गिल्ल यांनी २०२५-२०२६ या कालावधीत दाखल झालेल्या चोरी व घरफोडीच्या गुन्ह्यांचा आढावा घेत सराईत आरोपींवर लक्ष केंद्रीत करण्याचे आदेश दिले होते. त्यानुसार स्थानिक गुन्हे शाखेने तपास सुरू केला. तपासादरम्यान नारायणगाव व मंचर पोलीस स्टेशनच्या रेकॉर्डवरील आरोपी हर्षल तांदळे व महेश मंगळवेढेकर यांचा गुन्ह्यात सहभाग असल्याची माहिती गोपनीय बातमीदाराकडून मिळाली.
पोलिसांनी त्यांना ताब्यात घेऊन चौकशी केली असता, २० तोळे सोन्याचे दागिने, एक पल्सर मोटारसायकल आणि दोन बंब असा सुमारे २९ लाख रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला. या आरोपींकडून पारगाव, घोडेगाव, जुन्नर, नारायणगाव आणि आळेफाटा परिसरातील अनेक गुन्हे उघडकीस आले आहेत.
दरम्यान, पियुष नानावत याने दोन विधीसंघर्षित बालक साथीदाराच्या मदतीने पुणे जिल्ह्यातील इतर तालुक्यातील केलेल्या गुन्ह्यांमधून १२ तोळे सोन्याचे दागिने आणि मोटारसायकल असा सुमारे १७ लाख रुपयांचा मुद्देमाल पोलिसांनी हस्तगत केला आहे.





