Inspector Zende : ‘इन्स्पेक्टर झेंडे’चा ट्रेलर प्रदर्शित; मनोज वाजपेयींसोबत मराठमोळ्या कलाकारांची धडाकेबाज एंट्री!

Inspector Zende : प्रेक्षकांच्या अभिनयाने नेहमीच मंत्रमुग्ध करणारे मनोज वाजपेयी आता एका नव्या भूमिकेत दिसणार आहेत. त्यांच्या ‘इन्स्पेक्टर झेंडे’ या आगामी चित्रपटाचा ट्रेलर नुकताच प्रदर्शित झाला असून त्याला प्रचंड प्रतिसाद मिळतो आहे.
हा चित्रपट एका सत्य घटनेवर आधारित असून, मनोज वाजपेयी यात पोलीस अधिकारी मधुकर झेंडे यांची भूमिका साकारत आहेत. खास बाब म्हणजे या चित्रपटात मनोज वाजपेयींसोबत अनेक मराठी कलाकारांचाही सहभाग आहे.
ट्रेलरची वैशिष्ट्ये
ट्रेलर तब्बल २ मिनिटे ३२ सेकंदांचा असून त्यात एका साध्या पोलिस अधिकाऱ्याची असामान्य कहाणी दाखवली आहे. आपल्या धाडसावर आणि हुशारीवर भरवसा ठेवून हा अधिकारी अशक्य वाटणारा गुन्हा कसा उलगडतो, हे ट्रेलरमधून स्पष्ट होते. यात ॲक्शनसोबतच हलकीफुलकी कॉमेडीही दाखवली आहे, ज्यामुळे प्रेक्षकांमध्ये उत्सुकता अधिकच वाढली आहे. हा चित्रपट येत्या ५ सप्टेंबरला नेटफ्लिक्सवर प्रदर्शित होणार आहे.
मधुकर झेंडे यांची खरी कहाणी
मधुकर झेंडे यांनी कुख्यात गुन्हेगार चार्ल्स शोभराज याला दोन वेळा पकडले होते. त्यांच्याच शौर्यावर आधारित हा चित्रपट असून, मनोज वाजपेयी ‘इन्स्पेक्टर झेंडे’ बनले आहेत. तर जिम सरभने ‘स्विमसूट किलर’ चार्ल्स शोभराज याची भूमिका साकारली आहे.
याशिवाय मराठी कलाकार भालचंद्र कदम, गिरीजा ओक आणि हरीश दूधाडे हेही महत्त्वाच्या भूमिकांमध्ये दिसणार आहेत. त्यामुळे या चित्रपटाकडे मराठी प्रेक्षकांचे विशेष लक्ष लागले आहे.
दिग्दर्शन व निर्मिती
या चित्रपटाचे दिग्दर्शन चिन्मय डी. मांडलेकर यांनी केले असून, जय शेवकरमाणी आणि ओम राऊत यांनी निर्मिती केली आहे.
मनोज वाजपेयींची भावना
आपल्या भूमिकेबद्दल बोलताना मनोज वाजपेयी म्हणाले, “इन्स्पेक्टर झेंडे कधीच प्रसिद्धीच्या मागे धावले नाहीत, तरी त्यांनी एका धोकादायक गुन्हेगाराला दोनदा पकडलं. त्यांचं धाडस आणि मुंबईबद्दलचा दृष्टिकोन खरोखर प्रेरणादायी आहे. त्यांच्या भूमिकेत काम करताना मला एका नवीन जगाचा अनुभव आला. ट्रेलर ही फक्त झलक आहे, खरा चित्रपट प्रेक्षकांच्या मनाला भिडेल.”





