55 शिवभोजन केंद्रांची तपासणी

पुणे -पुणे व पिंपरी-चिंचवड शहरातील 55 शिवभोजन केंद्रांची तपासणी करण्यासाठी पाच पथके स्थापन करण्यात आली आहे.शिवभोजन केंद्रांवर अन्नाचा दर्जा, स्वच्छता, लाभार्थ्यांची ऍपवर नोंदणी होते का, या बाबींची तपासणी शहर अन्नधान्य वितरण कार्यालयाकडून सुरू करण्यात आली आहे.
गरीब व गरजू व्यक्तींना फक्त 10 रुपयात “शिवभोजन’ उपलब्ध करून देण्याचा निर्णय राज्य शासनाने घेतला आहे. त्यानुसार पुणे व पिंपरी-चिंचवड शहरात 55 ठिकाणी ही केंद्र सुरू करण्यात आली आहे. पुणे व पिंपरी-चिंचवड शहरांत दररोज 5 हजार 525 नागरिक या सुविधेचा लाभ घेतात. शिवभोजन केंद्राची तपासणी करण्यासाठी इतर विभागांतील झोनल अधिकारी यांची नियुक्ती केली आहे. जेणेकरून तपासणी पारदर्शकपणे व निष्पक्षपातीपणे होईल.
तपासणीमध्ये प्रामुख्याने अन्नाचा दर्जा, स्वच्छता, लाभार्थ्यांची शिवभोजन ऍपवर नोंदणी केली जाते का, हे तपासले जात आहे. तपासणी पथकाला काही उणिवा दिसल्या तर ते संबंधित केंद्र चालकाला सूचना करत आहेत. आज केलेल्या पाहणीमध्ये गरीब व्यक्ती, गरीब कुटुंबातील स्पर्धा परीक्षेचे विद्यार्थी, रुग्णांचे नातेवाईक आणि कामगार वर्ग यांना या सुविधेचा चांगला लाभ होत आहे.
– सचिन ढोले, शहर अन्नधान्य वितरण अधिकारी





