10 कोटी रुपयांचा इनपुट टॅक्स क्रेडिट घोटाळा; ‘महाराष्ट्र एंटरप्रायझेस’च्या मालकाला अटक

मुंबई – नवी मुंबई सीजीएसटी अर्थात केंद्रीय वस्तू आणि सेवा कर मंडळ आयुक्तालयाच्या अधिकाऱ्यांनी बेकायदेशीर इनपुट टॅक्स क्रेडिट रॅकेट चालवण्यात येत असल्याच्या गुप्त माहितीनुसार कारवाई करून महाराष्ट्र एंटरप्रायझेस या कंपनीच्या मालकाला अटक केली आहे.
तसेच केंद्रीय सीजीएसटी विभागाने 10 कोटी 28 लाख रुपयांची फसवणूक करणाऱ्या 15 बनावट संस्थांच्या नावावरील आणखी एका बनावट इनपुट टॅक्स क्रेडिट रॅकेटचा पर्दाफाश केला आहे, या व्यवहारात 57 कोटी रुपयांहून अधिक मूल्याच्या वस्तूंच्या कोणत्याही पावत्या न घेता किंवा प्रत्यक्षात या वस्तूंचा पुरवठा न करता बनावट पावत्यांवर हे घोटाळेबाज धातूच्या भंगार सामानाच्या खोट्या पावत्या जारी करून इनपुट टॅक्स क्रेडिट हडपत होते. मुंबई, औरंगाबाद आणि नाशिक या शहरांमध्ये या कंपनीच्या बेकायदेशीर व्यवहारांचे हे जाळे पसरले आहे.
ही कंपनी, लोखंडी कचरा आणि भंगार वितळवून त्यातील लोखंड अथवा पोलाद विकण्याचा व्यवसाय करण्यासाठी सरकारकडे नोंदणीकृत आहे. मात्र या कंपनीच्या मालकाने सीजीएसटी कायदा 2017 चे उल्लंघन करत, कोणत्याही वस्तू अथवा सेवा न घेता, अनुक्रमे, 5 कोटी 17 लाख आणि 5 कोटी 11 लाख रुपयांचे इनपुट टॅक्स क्रेडीट हडपले आणि फसवणुकीने त्याचा वापर केला असे तपासणीअंती निदर्शनास आले. या प्रकरणी अटक करण्यात आलेल्या व्यापाऱ्याला 27 जानेवारी पर्यंत न्यायालयीन कोठडी सुनावण्यात आली आहे.





