नव्या मुंबईत इमारत कोसळून तीन जण ठार

मुंबई – नवी मुंबईतील सीबीडी बेलापूर परिसरात शनिवारी पहाटे चार मजली निवासी इमारत कोसळून तीन जणांचा मृत्यू झाला तर दोन जण जखमी झाले आहेत. शाहबाज गावात पहाटे पाचच्या सुमाराला घडलेल्या या घटनेनंतर दोन जखमींना ढिगाऱ्याखालून जिवंत बाहेर काढण्यात आले.
इमारतीतील इतर ५२ रहिवाशांना वेळीच बाहेर काढले नसते तर ही दुर्घटना आणखी मोठी असू शकली असती. पहाटेच्या सुमारास इमारतीला भेगा दिसल्या.त्यानंतर लगबग करून तेथील रहिवाशांना बाहेर काढण्यात आले.
त्यानंतर ही चार मजली इमारत पहाटे कोसळली. ढिगाऱ्याखाली अडकलेल्या एक पुरुष आणि एका महिलेला बाहेर काढण्यात आले आणि त्यांना रुग्णालयात दाखल करण्यात आले.
राष्ट्रीय आपत्ती प्रतिसाद दल आणि अग्निशमन दलाच्या जवानांनी तातडीने बचाव कार्य सुरू केले. दुपारच्या सुमारास, ढिगाऱ्याखालून एका माणसाचा मृतदेह बाहेर काढण्यात आला, तर इतर दोघांचे मृतदेह काही तासांनंतर बाहेर काढण्यात आले.
महम्मद मिराज अल्ताफ हुसेन (३०), मिराज सैफ अन्सारी (२४) आणि सफिक अहमद रहमत अली अन्सारी (२८) अशी मृतांची नावे आहेत. कोसळलेली इमारत १० वर्षे जुनी असून अपघाताच्या कारणाची चौकशी केली जात आहे.





