“आदिवासी आणि सामाजिक निधीवर अन्याय करता येत नाही,” चंद्रशेखर बावनकुळेंची प्रतिक्रिया

Chandrashekhar Bawankule | उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी काल राष्ट्रवादी पक्षाच्या वर्धापणदिनाच्या कार्यक्रमात निधी वाटपावरून होणाऱ्या आरोपांवर सडेतोड उत्तर दिले. सामाजिक न्याय विभाग, आदिवासी विभागाचा निधी वळवल्याचा आरोप काही नेत्यांनी केला होता. त्यावर अजित पवार यांनी उत्तर देत थेट नाव न घेता मी खिशात पैसे घेऊन बसतो काय? असं म्हणत अजित पवार यांनी शिवसेनेच्या मंत्र्यांना अप्रत्यक्ष सुनावले आहे. यावर आता महसूलमंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी प्रतिक्रिया दिली आहे.
“अजित पवार हे नेहमी त्या डिपार्टमेंटच्या नेत्यांना बोलून निधी वाटप करतात. ते नेहमीच मंत्र्यांना बोलवतात. सामाजिक न्याय विभागाचा, आदिवासी कल्याण यांचा निधी राखीव आहे. तो कोणीही पळवू शकत नाही, त्याला कात्री लावता येत नाही. आदिवासी आणि सामाजिक निधीवर अन्याय करता येत नाही. देवेंद्र फडणवीस तसा अन्याय कधीही होऊ देणार नाहीत,” असे चंद्रशेखर बावनकुळे म्हणाले. दरम्यान, काही दिवसांपूर्वी सामाजिक न्याय विभागाचा निधी वळवल्यामुळे मंत्री संजय शिरसाट यांनी नाराजी व्यक्त केली होती.
संजय शिरसाट यांची बावनकुळेंनी घेतली भेट
दरम्यान, नुकतेच संजय शिरसाट यांची बावनकुळे यांनी भेट घेतली. त्याबाबत बावनकुळे म्हणाले की, “माझ्या मतदारसंघातील कामठी येथील ड्रॅगन पॅलेच्या विस्तारीकरणाला परवानगी मिळाले आहे. 240 कोटींच्या प्रकल्पाच्या या कामाचं भूमीपूजन करणे आणि तातडीने काम सुरू करणे ह्या विकास कामांसाठी मंत्री संजय शिरसाठ यांची भेट घेतली,” अशी माहिती बावनकुळे यांनी दिली. Chandrashekhar Bawankule |
दरम्यान, प्रहारचे प्रमुख बच्चू कडू यांचे विविध मागण्यांसाठी अन्नत्याग आंदोलन सुरु आहे. यावरही बावनकुळे यांनी प्रतिक्रिया दिली. “एसपी आणि कलेक्टरला मी पाठवले होते. वेगवेगळ्या विभागाचे बच्चू कडू यांनी प्रश्न मांडले आहेत. तुमच्या प्रकृतीची आम्ही काळजी घेत आहे, आंदोलनाला बसलेल्या व्यक्तींची काळजी घेतो. मुख्यमंत्र्यांशी बोलून याबाबत तातडीने बैठक घेऊ,” असेही बावनकुळे म्हणाले. Chandrashekhar Bawankule |
हेही वाचा:





