Shubman Gill ruled out of IND vs SA Guwahati Test : भारत आणि दक्षिण आफ्रिका यांच्यातील कसोटी मालिकेतील दुसऱ्या सामन्यात टीम इंडियाला मोठा धक्का बसला आहे. गुवाहाटी येथे होणाऱ्या या निर्णायक कसोटीत कर्णधार शुबमन गिल खेळणार नसल्याचे आता निश्चित झाले आहे. गिलच्या अनुपस्थितीमुळे संघाच्या अडचणी वाढल्या आहेत. त्याच्या मानेला झालेला ताण अजूनही पूर्णपणे बरा न झाल्याने, संघाला पंतच्या नेतृत्वाखाली मैदानात उतरावे लागणार आहे. प्लेइंग इलेव्हनमध्ये होणार मोठे फेरबदल – शुबमन गिल खेळणार नसल्याचे स्पष्ट झाल्यानंतर, त्याच्या जागी कोणाला संधी द्यायची, यावर संघ व्यवस्थापनात विचारमंथन सुरू आहे. सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, कोलकाता कसोटीतून धडा घेत टीम इंडिया यावेळी प्लेइंग इलेव्हनमध्ये संतुलन साधण्याचा प्रयत्न करणार आहे. टाइम्स ऑफ इंडियाच्या वृत्तानुसार, या बदलाची किंमत अष्टपैलू खेळाडू अक्षर पटेलला चुकवावी लागू शकते. एका ऑलराउंडरचा पत्ता कट होणार – गिलच्या जागी युवा फलंदाज साई सुदर्शनला संधी मिळण्याची शक्यता आहे, तर संघ चारऐवजी फक्त तीन फिरकीपटूंसह मैदानात उतरू शकतो. अक्षर पटेलला वगळले जाण्याची शक्यता आहे, कारण संघ व्यवस्थापन वॉशिंग्टन सुंदरच्या फलंदाजीचा वापर करू इच्छिते. कोलकाता कसोटीत त्याला तिसऱ्या क्रमांकावर फलंदाजीला उतरवण्याचा प्रयोगही करण्यात आला होता. हेही वाचा – Shai Hope Record : शाई होपचा विश्वविक्रमी धमाका! गिलख्रिस्ट-बटलरचा १९ वर्ष जुना विक्रम चक्काचूर अक्षर पटेलच का बाहेर? रवींद्र जडेजा आणि कुलदीप यादव सध्या संघातील सर्वोत्तम फिरकीपटू असल्याने त्यांना बाहेर बसवणे शक्य नाही. त्यामुळे, अक्षर पटेलच्या जागी संघात साई सुदर्शन आणि वेगवान गोलंदाजीसाठी नीतीश कुमार रेड्डी याला संधी मिळू शकते, ज्यामुळे संघात उजव्या हाताचा अतिरिक्त फलंदाज येईल आणि प्लेइंग-११ मध्ये चांगले संतुलन राखता येईल.