प्रभात वृत्तसेवा पुणे- अपघातात जखमी झालेल्या वृद्धाला रुग्णालयात नेण्याऐवजी रिक्षाचालकाने निर्जन ठिकाणी फेकून दिल्याची घटना घडली आहे. बाणेर पोलिसांनी रिक्षाचालकाविरोधात सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल केला आहे. मानवतेला काळिमा फासणाऱ्या या घटनेत गोपाल गोविंद वाघ ( ६३, रा. बालेवाडी) या ज्येष्ठाचा मृत्यू झाला आहे. त्यांचा मुलगा अमितकुमार वाघ यांनी दिलेल्या फिर्यादीनुसार २० जुलै रोजी त्यांचे वडील दुपारी साडेतीन वाजता सुनेला सांगून घरातून ॲक्टिव्हाने बाहेर पडले. रात्री उशिरापर्यंत परत न आल्याने नातेवाईकांकडे, परिसरात शोध सुरू केला. बाणेर पोलीस ठाण्यात हरवल्याची तक्रार केली. पोलिसांनी सीसीटीव्ही फूटेज तपासले तेव्हा गोपाल वाघ रस्ता ओलांडताना एका रिक्षाचालकाने त्यांना जोरात धडक दिल्याचे दिसले. रिक्षाचालकाने मदतीच्या बहाण्याने त्यांना रिक्षात बसवले आणि उलट दिशेने बाणेरच्या दिशेने घेऊन गेला. २१ जुलै रोजी संध्याकाळी पोलिसांनी फिर्यादी अमितकुमार यांना फोन करून सांगितले की, रेंजहिल्स रेल्वे लाइनजवळ युनियन क्लबच्या शेजारी एक व्यक्ती बेशुध्दावस्थेत आढळली आहे. कुटुंबीयांनी घटनास्थळी जाऊन पाहिले असता, गोपाल वाघ हे गंभीर जखमी अवस्थेत गवतात पडलेले आढळले. त्यांना तत्काळ ससून रुग्णालयात नेले असता डॉक्टरांनी मृत घोषित केले. तपासात उघड झाले की, रिक्षाचालकाने जाणीवपूर्वक गोपाल वाघ यांना रुग्णालयात नेले नाही. उलट त्यांना कोणीही पाहू नये म्हणून निर्जन ठिकाणी सोडून दिले. वैद्यकीय अहवालानुसार, डोक्याला झालेल्या गंभीर दुखापतीमुळे त्यांचा मृत्यू झाला. वेळेवर उपचार मिळाले असते तर त्यांचा जीव वाचू शकला असता. याप्रकरणी पोलीस उपनिरीक्षक अनिल केकाण तपास करत आहेत. वरीष्ठ पोलीस निरीक्षक चंद्रशेखर सावंत यांच्या माहितीनुसार सीसीटीव्हीच्या आधारे रिक्षामालक, चालकाची ओळख पटली आहे. मात्र, आरोपी रिक्षाचालक सध्या फरार असून, त्याचा शोध सुरू आहे.