विद्यार्थ्यांच्या वाहन परवान्यासाठी पिंपरी चिंचवड आरटीओचा पुढाकार

पिंपरी, दि. 16 (प्रतिनिधी) – विद्यार्थ्यांना आता महाविद्यालयातच शिकाऊ परवाना मिळणार आहे. त्यासाठी पिंपरी चिंचवडचे उपप्रादेशिक परिवहन (आरटीओ ) कार्यालय पुढाकार घेणार आहे. पिंपरी चिंचवड शहरासह ग्रामीण भागातील 8 महाविद्यालयांमध्ये शिबिर आयोजित करण्यात येणार आहे. महाविद्यालयांना आरटीओकडून कॅम्पच्या आयोजनाबाबत पत्र देखील देण्यात आले आहे.
शालेय तसेच महाविद्यालयातील विद्यार्थ्यांमध्ये वाहतूक नियमांबाबत जागृती होणे गरजेचे आहे. विद्यार्थ्यांच्या हातात वाहनांची चावी आल्यानंतर वाहने सुसाट चालवित वाहतूक नियमांचा भंग केला जात आहे. वाहतूक नियमांबाबत जागरूकता यावी, या उद्देशाने परिवहन कार्यालयाकडून महाविद्यालयात कॅम्पचे आयोजन केले जाणार आहे. या कॅम्प मध्ये विद्यार्थ्यांमध्ये वाहतूक नियमांबाबत जनजागृती केली जाणार आहे. तसेच विद्यार्थ्यांना कागदपत्रांची पूर्तता केल्यानंतर चाचणी करून महाविद्यालयातच शिकाऊ वाहन परवाना देण्याची सुविधा उपलब्ध करून देण्यात आली आहे.
पिंपरी चिंचवडचे उपप्रादेशिक परिवहन (आरटीओ ) कार्यालयाने असे कॅम्प आयोजन करण्याबाबत पिंपरी चिंचवड मधील चार आणि ग्रामीण भागातील चार महाविद्यालयांना पत्र दिले आहे. महाविद्यालयाकडून सकारात्मक प्रतिसाद आल्यानंतर विद्यार्थ्यांची नोंदणी केली जाणार आहे. त्यानंतर कॅम्प कधी घेतला जाणार हे निश्चित केले जाणार असल्याचे अधिकाऱ्यांनी सांगितले.
महाविद्यालयांमध्ये आपण शिबिराद्वारे विद्यार्थ्यांना परवाना देण्याची सुविधा देणार आहे. सुरूवातीला प्रायोगिक तत्त्वावर 8 महाविद्यालय घेतले आहेत. नंतर ज्यांची इच्छा आहे त्यांनी अर्ज करावे. तिथे शिबिर घेण्यात येईल.
– अतुल आदे, उप प्रादेशिक परिवहन अधिकारी, पिंपरी-चिंचवड
हेलपाटे थांबणार
शिकाऊ परवाना मिळविण्यासाठी पिंपरी चिंचवड उपप्रादेशिक परिवहन (आरटीओ) कार्यालयात रांगेत उभे राहावे लागते. एका प्रक्रियेत काम होत नसल्याने वारंवार कार्यालयात हेलपाटे मारावे लागतात. अनेकदा महाविद्यालयाला सुट्टी घेण्याची वेळ येत आहे. मात्र आता महाविद्यालयातच शिकाऊ परवाना मिळण्याची सोय होणार असल्याने विद्यार्थ्यांचे हेलपाटे आणि वेळ दोन्हीही वाचणार आहे.
मागणीनुसार
शिबिरांचे आयोजन
शंभरपेक्षा अधिक विद्यार्थी वाहन परवाना काढण्यासाठी ईच्छुक असल्यास महाविद्यालयाने आरटीओकडे कॅम्पबाबत अर्ज करण्याची सुविधा उपलब्ध आहे. आलेल्या अर्जाचा विचार करून आरटीओ त्या महाविद्यालयात शिबिराचे आयोजन करणार आहे. त्यासाठी महाविद्यालयाने देखील अर्ज करावे, असे आवाहन अधिकारी करत आहेत.





