अनधिकृत होर्डिंगची माहिती लपवली; परवाना निरीक्षक निलंबित, एकाची वेतनवाढ रोखली

पुणे – नगररस्ता – वडगावशेरी क्षेत्रीय कार्यालयाच्या हद्दीत अनधिकृत होर्डींगची भरमार असताना केवळ सात अनधिकृत होर्डींगची माहिती देत ३५ अनधिकृत होर्डींगची माहिती लपविणे परवाना निरिक्षकांना भोवले आहे. या प्रकरणी अतिरिक्त आयुक्त पृथ्वीराज बी.पी यांनी नगररस्ता – वडगावशेरी क्षेत्रीय कार्यालयाचे वरिष्ठ लिपिकाला ( परवाना निरिक्षक) निलंबित केले आहे. तर, कनिष्ट लिपिक ( परवाना निरिक्षक) एक वेतनवाढ रोखण्यात आली आहे.
शहरामध्ये अनधिकृत जाहिरात फलक (होर्डिंग) धोकादायक स्वरूपात पुणेकरांच्या डोक्यांवर यमदूतासारखे उभे आहेत. यंदा पावसाळ्यात तीन ठिकाणी होर्डिंग पडली आहेत. शहरात महापालिकेने मान्यता दिलेले २६४० अधिकृत होर्डिंग आहेत. या वर्षी शहरात पूर्वमोसमी पावसाने धुमाकूळ घातल्याने पालिकेने पावसाळ्यातील खरबदारीच्या अनुषंगाने तातडीने अनधिकृत होर्डिंग काढून त्याचा अहवाल सादर करण्याचे आदेश क्षेत्रीय कार्यालयांना दिले होते. त्यानंतर १४ क्षेत्रीय कार्यालयांनी दिलेल्या अहवालात शहरात केवळ २४ अनधिकृत जाहिरात फलक (होर्डिंग) असल्याचे नमूद करण्यात आले होते.
त्यानंतर महापालिका आयुक्तांनी तत्काळ ती तातडीनं काढण्याचे आदेश दिले. त्यानुसार, आकाशचिन्ह आणि परवाना विभागाने २२ होर्डिंग काढले असून, दोन होर्डिंगबाबत वाद सुरू आहे. त्यानंतरही अनधिकृत होर्डिंगला अधिकारीच आर्थिक देवणा-घेवाणीतून पाठबळ देत असल्याने आयुक्तांकडून अशा अनधिकृत होर्डिंगची तपासणी करण्याचे आदेश दिले होते.
आयुक्तांना सादर करण्यात आलेल्या अहवालात नगररस्ता – वडगावशेरी क्षेत्रीय क्षेत्रीय कार्यालयाच्या हद्दीत केवळ ७ अनधिकृत होर्डींग असल्याचे नमूद केले होते. मात्र, आयुक्तांच्या आदेशात नेमण्यात आलेल्या पथकाने तब्बल ३५ अनधिकृत होर्डींग शोधून काढली. त्यानंतर, या दोन्ही कर्मचाऱ्यांना नोटीस बजाविण्यात आली तसेच याबाबत स्पष्ट खुलासा मागण्यात आला. मात्र, तो खुलासाही दिशाभूल करणार करण्यात आला. त्यामुळे आयुक्तांनी दिलेल्या आदेशानुसार या दोन्ही कर्मचाऱ्यांवर कारवाई करण्यात आली आहे.




