पुणे | पीएमआरडीए हद्दीतही मृत्यूचे सापळे

पुणे, {प्रभात वृत्तसेवा} – पुणे महानगर प्रदेश विकास प्राधिकरणाच्या (पीएमआरडीए) हद्दीत सुमारे दीड हजारांपेक्षा अनधिकृत होर्डिंग्ज आहेत. पण, त्यावर आतापर्यंत ठोस कारवाई करण्यात आलेली नाही. घाटकोपर येथील दुर्घटनेच्या पार्श्वभूमीवर होर्डिंग्जचा मुद्दा ऐरणीवर आला आहे.
अनधिकृत होर्डिंग्ज हटविण्याचे आवाहन प्रशासन वारंवार करते. पण, होर्डिंगमालकांनी याला दाद दिलेली नाही. आता या अनधिकृत होर्डिंग्जवर कारवाईचे धाडस “पीएमआरडीए’ दाखविणार का? असा प्रश्न उपस्थित होत आहे.
मागील वर्षी कात्रज – देहू बाह्यवळण मार्गावरील किवळे येथे होर्डिंग कोसळून पाच नागरिकांचा मृत्यू झाला होता. या घटनेमुळे खडबडून जागे झालेल्या प्रशासनाने जिल्ह्यातील ग्रामपंचायतींच्या हद्दीतमध्ये होर्डिंग्जचा सर्व्हे करण्याचा निर्णय घेतला. त्यामध्ये प्रामुख्याने 10 तालुक्यांमध्ये 1 हजार 440 होर्डिंग्ज आढळून आले.
त्यामध्ये फक्त 27 होर्डिंग्ज अधिकृत होते. विशेष म्हणजे यातील 87 होर्डिंग्ज धोकादायक आढळून आले. पण, या सर्वेक्षणानंतर या होर्डिंग्जवर कोणतीच कारवाई करण्यात आलेली नाही. फक्त कागदी घोडे नाचवत सर्वेक्षणाचा अहवाल तसाच धुळखात पडला आहे.
“पीएमआरडीए’ हद्दीतील सुमारे 700 ग्रामपंचायतींच्या हद्दीतील होर्डिंग्ज, फ्लेक्सला परवानगी देण्याचे अधिकार प्राधिकरणाला आहेत. पीएमआरडीए क्षेत्रात होर्डिंग्ज उभारण्याचे धोरण किंवा नियंत्रणाचे नियम नव्हते. त्यामुळे फलकबाजांकडून हजारो अनधिकृत होर्डिंग्ज उभारण्यात आले आहेत. त्यास कोणाचीही परवानगी नाही. यांपैकी बऱ्याच होर्डिंग्जला संरचनात्मक स्थिरता (स्टेबिलिटी) नसल्यामुळे अपघातही घडले आहेत.
यामध्ये काही नागरिकांचा जीवही गेला आहे. अशा होर्डिंग्जवर कायदेशीर तरतुदीनुसार कारवाई करणे अडचणीचे होत होते. त्यामुळे प्राधिकरणाने आकाशचिन्ह परवाना धोरण राबविण्याचा निर्णय घेतला. त्यानुसार प्राधिकरणाच्या हद्दीत होर्डिंग्ज, बॅनर, फ्लेक्स, जाहीरात फलक उभारण्यासाठी पीएमआरडीएची परवानगी घेणे बंधनकारक केले. या निर्णयामुळे होर्डिंगला परवानगी देण्यासह अनधिकृत होर्डिंग्जवर कारवाईचा मार्ग मोकळा झाला. मात्र, तरीही प्रशासनाकडून असे होर्डिंग्ज जमीनदोस्त करण्यास टाळाटाळ होत आहे.
पैशांच्या हव्यासापोटी नागरिकांचा बळी
मुख्य रस्त्याच्या कडेला प्रामुख्याने होर्डिंग्ज उभारले जातात. जागामालक होर्डिंग भाड्याने देऊन पैसे कमावतो. एकतर या होर्डिंगसाठी बहुतेक जागामालक परवानगी न घेताच होर्डिंग उभारतात.
तो सांगाडा उभारताना वाऱ्याचा वेग, साच्याची मजबुती आदींचा विचार केला जात नाही. फक्त पटकन होर्डिंग उभारून त्यामधून पैसे कमाविण्याचा मुख्य उद्देश असतो. त्यामुळे नागरिकांची सुरक्षितता यावर होर्डिंगमालकाकडून कोणताच विचार होताना दिसत नाही.
प्रवाशांच्या मनात भीती
होर्डिंग कोसळण्याचा घटनेमुळे आतापर्यंत अनेक निष्पापांचा बळी गेला आहे. कोणी पाऊस लागतो म्हणून होर्डिंगच्या आसरा घेतो. तर कोणी होर्डिंगजवळून पायी, तर कोणी वाहनातून प्रवास करतो. अशातच होर्डिंग कोसळून निष्पाप नागरिक जीव गमावतो. काही होर्डिंगचा आकार पाहता ते अवाढव्य असतात. त्यामुळे मोठ्या होर्डिंगजवळून प्रवास करताना नागरिकांच्या मनात भीती निर्माण होते आहे.
सर्वाधिक होर्डिंग्ज मुळशी तालुक्यात
सर्वाधिक होर्डिंग्ज हे मुळशी तालुक्यात असल्याचे जिल्हा परिषदेने यापूर्वी केलेल्या सर्वेक्षणात आढळून आले. हा आकडा तब्बल ३८२ असल्याचे समोर आले. भुगाव, भुकुम, पिरंगुट, घोटावडे फाटा, पौड येथे सर्वाधिक होर्डिंग्ज आहेत. चांदणी चौक ते ताम्हिणी घाटापर्यंत रस्त्याच्या दोन्ही बाजूंनी मोठ-मोठे होर्डिंग्ज उभारण्यात आले आहेत.
रस्त्यांच्या दुतर्फा जणू होर्डिंग्ज उभारण्याची जणू स्पर्धाच लागली आहे की काय, अशी स्थिती आहे. यामुळे येथील निसर्ग सौंदर्यालाही बाधा निर्माण झाली आहे. यांसह या होर्डिंग्जमुळे रस्त्यावरून ये-जा करणाऱ्यांना जीव मुठीत धरून प्रवास करावा लागतो आहे.




