कोरोनाच्या पहिल्या रुग्णावर उपचार करणाऱ्या डॉक्टरला संसर्ग

नवी दिल्ली : भारतामध्ये कोरोना विषाणूमुळे मृत्यू झालेल्या पहिल्या रुग्णावर उपचार करणाऱ्या डॉक्टरला कोरोना विषाणूचा संसर्ग झाला आहे. या डॉक्टरवर सध्या त्यांच्याच घरी उपचार सुरु आहेत. त्यांना त्याच्या कुटुंबियांपासून वेगळे ठेवण्यात आले आहे. आज त्यांना आयसोलेशन वॉर्डात उपचारासाठी दाखल करण्यात येणार आहे. कलबुर्गीच्या उपायुक्तांनी ही माहिती दिली आहे.
कर्नाटकातील कलबुर्गी येथे 76 वर्षांच्या एका व्यक्तीचा मृत्यू झाला होता. या रुग्णावर उपचार करणाऱ्या डॉक्टरलाच संसर्ग झाल्याचे समोर आले आहे. सध्या कर्नाटकामध्ये कोरोनाची लागण झाल्याची दोन नवीन प्रकरणे समोर आली आहेत. त्यामध्ये 63 वर्षांच्या डॉक्टराचा समावेश आहे. दरम्यान, कोरोना विषाणू वेगाने पसरत असल्याने कर्नाटक सरकारने मॉल, चित्रपटगृह, उद्याने बंद करण्याचे आदेश दिले आहेत.
चीनच्या वुहान प्रांतातून पसरलेल्या कोरोना विषाणूमुळे जगभरामध्ये भितीचे वातावरण आहे. कोरोना विषाणूने जगभरात आतापर्यंत 7 हजार पेक्षा जास्त लोकांचा मृत्यू झाला आहे. तर 1 लाख 73 हजार 171 नागरिकांना कोरोनाची लागण झाली आहे. तर यामध्ये एकट्या चीनमध्ये 3 हजार 213 नागरिकांचा मृत्यू झाला आहे तर 80 हजार 860 नागरिकांना याची लागण झाली आहे. भारतामध्ये कोरोना रुग्णांची संख्या 125 झाली आहे. तर तीन नागरिकांचा मृत्यू झाला आहे.





