Shafali Verma broke two records in IND W vs SA W Final : आयसीसी महिला वनडे विश्व कप २०२५ च्या अंतिम सामन्यात भारतीय महिला संघाची युवा सलामीवीर शैफाली वर्मा हिने दक्षिण आफ्रिकेविरुद्ध ८७ धावांची शानदार खेळी करून मोठा इतिहास रचला आहे. तिच्या या महत्त्वपूर्ण खेळीमुळे भारताच्या डावाला बळकटी मिळालीच, शिवाय तिने एकाच सामन्यात ८ वर्षांपूर्वीचे दोन मोठे विश्वविक्रम मोडण्यात यश मिळवले. पूनम राऊतचा मोडला ८ वर्षांपूर्वीचा विक्रम – सेमीफायनलपूर्वी दुखापतग्रस्त प्रतिका रावलच्या जागी मुख्य संघात आलेल्या शफाली वर्मासाठी हा अंतिम सामना तिच्या कारकिर्दीतील सर्वात मोठा क्षण ठरला. सेमीफायनलमध्ये फारशी चमक न दाखवता आलेल्या शफालीने फायनलमध्ये मात्र आपल्या नैसर्गिक आक्रमक शैलीत फलंदाजी केली. शफालीने ७८ चेंडूंचा सामना करताना ७ चौकार आणि २ षटकारांच्या मदतीने ८७ धावांची उत्कृष्ट खेळी साकारली. या खेळीसह ती महिला वनडे विश्व कपच्या अंतिम सामन्यात भारतीय संघासाठी सर्वाधिक वैयक्तिक धावा करणारी खेळाडू ठरली आहे. यासह शफालीने पूनम राऊतचा ८ वर्षांपूर्वीचा विक्रम मोडला. पूनम राऊतने २०१७ च्या महिला वनडे विश्व कपच्या अंतिम सामन्यात इंग्लंडविरुद्ध ८६ धावांची खेळी साकारली होती. हेही वाचा – IND W vs SA W Final : स्मृतीने फायनलमध्ये रचला नवा इतिहास! मिताली मागे टाकत वर्ल्डकपमध्ये ‘हा’ पराक्रम करणारी पहिलीच खेळाडू फायनलमध्ये ५० पेक्षा जास्त धावा करणारी सर्वात युवा महिला खेळाडू – शफाली वर्माने केवळ पूनम राऊतचा विक्रमच मोडला नाही, तर तिने १२ वर्षांपूर्वीचा आणखी एक मोठा जागतिक विक्रम आपल्या नावावर केला आहे. ती आता महिला वनडे विश्व कपच्या अंतिम सामन्यात ५० हून अधिक धावा करणारी जगातील सर्वात युवा महिला खेळाडू बनली आहे. शफालीने २१ वर्षे २७८ दिवसांच्या वयात ही ५० हून अधिक धावांची खेळी साकारली. हेही वाचा – IND vs AUS : अभिषेक शर्माने मोडला सात वर्षांचा जुना विक्रम! ‘हा’ पराक्रम करणारा ठरला पहिला भारतीय खेळाडू यापूर्वी हा विक्रम जेस कॅमरून (आता जेस डफिन) यांच्या नावावर होता. त्यांनी २०१३ मध्ये वेस्ट इंडिजविरुद्धच्या फायनलमध्ये २३ वर्षे २३५ दिवसांच्या वयात ७५ धावांची खेळी केली होती. सेमीफायनलपूर्वी शैफालीला मुख्य संघात संधी मिळाली होती आणि तिने अंतिम सामन्यात केलेल्या या ऐतिहासिक कामगिरीमुळे भारतीय क्रिकेटमध्ये एक नवा अध्याय जोडला गेला आहे.