INDW vs SAW 3rd T20I : मालिका बरोबरीत..! तिसऱ्या टी-20 सामन्यात भारताचा आफ्रिकेवर एकतर्फी विजय…

INDW vs SAW 3rd T20I Match Result : हरमनप्रीत कौरच्या नेतृत्वाखाली, भारतीय महिला क्रिकेट संघाने दक्षिण आफ्रिकेविरुद्धच्या 3 सामन्यांच्या टी-20 मालिकेतील शेवटचा सामना 10 गडी राखून जिंकण्यात यश मिळविले. या सामन्यात टीम इंडियाने नाणेफेक जिंकून प्रथम गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला होता, त्यानंतर पूजा वस्त्राकर आणि राधा यादव यांच्या शानदार गोलंदाजीमुळे आफ्रिकन संघाचा डाव केवळ 84 धावांवर आटोपला. या सोप्या लक्ष्याचा पाठलाग करण्यासाठी उतरलेल्या भारतीय संघाने 10.5 षटकांतच सामना जिंकला. पूजा वस्त्राकर ही तिसऱ्या सामन्याची सामनावीर तर मालिकेची मानकरीही पूजा ठरली. पूजाने मालिकेत एकूण 8 विकेट्स घेतल्या.
यासह ही मालिका 1-1 अशी बरोबरीत सोडवण्यात टीम इंडियाला यश आले. तीन सामन्यांच्या टी-20 मालिकेतील पहिला सामना भारताने 12 धावांनी गमावला होता तर दुसरा सामना पावसामुळे पूर्णपणे होऊ शकला नव्हता. त्याच वेळी, हरमनप्रीत कौरच्या नेतृत्वाखालील भारतीय संघाने दक्षिण आफ्रिकेला एकदिवसीय मालिकेत 3-0 ने व्हाईटवाॅश दिला होता तर एकमेव कसोटीतही विजयी पताका फडकवली होती. यासह दक्षिण आफ्रिकेचा भारत दौरा संपला आहे.
For her 4 wickets and tight bowling, @Vastrakarp25 is awarded Player of the Match 🏆
Scorecard ▶️ https://t.co/NpEloo6GAm#TeamIndia | #INDvSA | @idfcfirstbank pic.twitter.com/ATIcp31Pid
— BCCI Women (@BCCIWomen) July 9, 2024
वस्त्राकर आणि यादव हिने मिळून घेतल्या 7 विकेट
चेन्नईच्या एमए चिदंबरम स्टेडियमवर खेळल्या गेलेल्या या मालिकेतील तिसऱ्या आणि शेवटच्या सामन्यात भारतीय संघाची कर्णधार हरमनप्रीत कौरने नाणेफेक जिंकून प्रथम गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला होता, त्यानंतर टीम इंडियाच्या गोलंदाजांनी आफ्रिकन फलंदाजांवर पूर्णपणे वर्चस्व गादवले . दक्षिण आफ्रिकेच्या महिला संघाने पहिल्या 6 षटकात 2 गडी गमावले होते, 61 धावा होईपर्यंत त्यांचा निम्मा संघ पॅव्हेलियनमध्ये परतला होता. येथून, टीम इंडियाच्या गोलंदाजांनी आफ्रिकन संघाला पुनरागमन करण्याची एकही संधी दिली नाही आणि त्यांचा डाव 17.1 षटकांत 84 धावांवर संपवला.
आफ्रिकन महिला संघाच्या डावात केवळ 3 फलंदाज दुहेरी आकडा गाठण्यात यशस्वी ठरले. ज्यामध्ये ताजमीन ब्रिट्सच्या बॅटमधून सर्वाधिक 20 धावा आल्या. याव्यतिरिक्त एनेके बॉश 17 ,मारिजेन कैप 10 तर कर्णधार लौरा वोल्वार्ड्ट फक्त 9 धावा काढून माघारी परतली होती. भारताकडून गोलंदाजीत पूजा वस्त्राकरने 3.1 षटकात 13 धावा देऊन 4 बळी घेतले, तर राधा यादवने 3 षटकात 6 धावा देत 3 बळी घेतले. याशिवाय अरुंधती रेड्डी, श्रेयंका पाटील आणि दीप्ती शर्मा यांनीही प्रत्येकी 1 बळी घेण्यात यश मिळवले.
Team India : गौतम गंभीर टीम इंडियाचा नवा मुख्य प्रशिक्षक, जय शाहांनी केली मोठी घोषणा…
मानधना आणि शेफाली जोडीने मिळवला सहज विजय..
विजयासाठी 85 धावांच्या सोप्या लक्ष्याचा पाठलाग करताना स्मृती मानधना आणि शेफाली वर्मा या जोडीने भारतीय महिला संघाला सहज विजय मिळवून देण्यात महत्त्वाची भूमिका बजावली. या दोघींनी पहिल्या 6 षटकांत संघाची धावसंख्या 40 धावांपर्यंत नेली, तर 10.5 षटकांतच कोणतेही नुकसान न करता लक्ष्य गाठले. मंधानाने 40 चेंडूत 54 धावांची नाबाद खेळी केली, तर शेफालीने 25 चेंडूत 27 धावा केल्या. आता भारतीय महिला संघ श्रीलंकेत होणाऱ्या आशिया कपमध्ये खेळताना दिसत आहे, ज्यामध्ये टीम इंडियाचा सामना 19 जुलै रोजी पाकिस्तानच्या महिला संघाशी होणार आहे.



