IND vs SA 2nd ODI : टीम इंडियाचा शेवटच्या बॉलवर थरारक विजय! आफ्रिकेला 4 धावांनी नमवत मालिकेत घेतली विजयी आघाडी…

IND vs SA 2nd ODI : भारतीय महिला क्रिकेट संघाने दक्षिण आफ्रिकेचा 4 धावांनी पराभव केला आहे. यासह भारताने 3 सामन्यांच्या वनडे मालिकेत 2-0 अशी अजेय आघाडी घेतली आहे. दक्षिण आफ्रिकेला 326 धावांचा पाठलाग करताना विजयासाठी शेवटच्या षटकामध्ये 11 आणि शेवटच्या चेंडूत 5 धावांची गरज होती. मात्र पूजा वस्त्राकर हीने शानदार पद्धतीने या 10 धावांचा बचाव केला आणि टीम इंडियाने रोमहर्षक सामना 4 धावांनी जिंकला. दक्षिण आफ्रिकेला 50 षटकामध्ये 6 विकेट्स गमावून 321 धावाच करता आल्या. कॅप्टन लॉरा वोल्वार्ड (नाबाद 135) आणि मारिझान कॅप (114) या दोघींनी शतकं ठोकून टीमला विजयाजवळ आणून ठेवलं. मात्र या दोघींची खेळी व्यर्थ गेली. टीम इंडियाने या विजयासह मालिका जिंकली आहे.
India clinch a last-ball thriller 🤩
They take an unassailable 2-0 lead against South Africa 👏#INDvSA | 🔗: https://t.co/HWxjkYg4wE pic.twitter.com/QEfyT46HuT
— ICC (@ICC) June 19, 2024
लक्ष्याचा पाठलाग करण्यासाठी दक्षिण आफ्रिका मैदानात उतरली तेव्हा संघाची सुरुवात खूपच खराब झाली. पण कर्णधार लॉरा वूलवर्थ आणि मारिजने कॅप यांच्या 184 धावांच्या भागीदारीने भारतीय कॅम्पच्या हृदयाचे ठोके वाढवले होते. मात्र अखेरच्या 5 षटकांमध्ये भारताच्या चांगल्या गोलंदाजीने संघाला विजयापर्यंत नेले.
लक्ष्याचा पाठलाग करताना आफ्रिकेने 14 धावांवर पहिली विकेट गमावली. अरुंधती रॉयने पहिला धक्का दिला आणि त्यानंतर काही वेळातच दीप्ती शर्माने आफ्रिकन संघाला दुसरा धक्का दिला. त्यामुळे, आफ्रिकेने 54 धावांवर 2 विकेट गमावल्या. दरम्यान, सामन्याची शतकवीर मंधाना हिनेही सामन्यात गोलंदाजी करताना दुसऱ्या चेंडूवर कारकिर्दीतील पहिली विकेट घेतली. आफ्रिकेने 67 धावांच्या आत 3 विकेट गमावल्या होत्या, परंतु येथून कर्णधार लॉरा वूलवर्थ आणि मॅरिझान कॅप यांच्यात 181 धावांची उत्कृष्ट भागीदारी झाली. 43 व्या षटकात, कॅप ही 94 चेंडूत 114 धावा केल्यानंतर बाद झाली. तिने तिच्या डावात 11 चौकार आणि 3 षटकार मारले.
शेवटच्या 5 षटकात दक्षिण आफ्रिकेला विजयासाठी 54 धावांची गरज होती. पुढच्या 3 षटकात 31 धावा झाल्या, त्यामुळे भारत पराभवाच्या जवळ जाताना दिसत होता. परिस्थिती अशी होती की आफ्रिकेला विजयासाठी शेवटच्या 2 षटकात 23 धावा आणि शेवटच्या षटकात 11 धावा करायच्या होत्या. पण शेवटच्या षटकात 2 विकेट पडल्याने संपूर्ण सामना उलटला आणि भारताने 4 धावांनी रोमहर्षक विजयाची नोंद केली.
अखेरच्या षटकात सामना फिरला..
पूजा वस्त्राकरला शेवटच्या षटकात 11 धावाचा बचाव करायचा होता. पहिल्या 2 चेंडूत 5 धावा झाल्या होत्या. पण पूजाने पुढच्या 2 चेंडूत 2 बळी घेत संपूर्ण सामन्याचा मार्गच बदलून टाकला. पहिल्या चेंडूवर एकेरी घेणे कर्णधार लॉरा वूलवर्थला महागात पडले कारण शेवटच्या चेंडूवर तिला पुन्हा स्ट्राइक मिळाली. जेव्हा संघाला एका चेंडूत 5 धावा करायच्या होत्या.
शेवटचा चेंडू निर्धाव राहिला, त्यामुळे भारतीय संघ सामना जिंकण्यात यशस्वी ठरला.
तत्पूर्वी, दक्षिण आफ्रिकेने नाणेफेक जिंकून प्रथम गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. नाणेफेक हरल्यानंतर स्मृति मंधाना आणि कर्णधार हरमनप्रीत कौरच्या शतकी खेळीच्या जोरावर भारतीय महिला संघाने दक्षिण आफ्रिकेविरुद्ध प्रथम फलंदाजी करताना 50 षटकात 3 बाद 325 धावसंख्येपर्यंत मजल मारली होती.
IND vs SA 2nd ODI : स्मृती मंधानाचे सलग दुसरे शतक, टीम इंडियाचा आफ्रिकेसमोर धावांचा डोंगर…
स्मृती मंधाना आणि शेफाली वर्माने सलामी दिली, पण टीम इंडियाची धावसंख्या 38 असताना शेफाली 20 धावा करून बाद झाली. हेमलताही जास्त वेळ खेळपट्टीवर टिकून राहू शकली नाही, तिने 24 धावांचे योगदान दिले. एकवेळ भारताने 100 धावांवर 2 विकेट गमावल्या होत्या, मात्र येथून कर्णधार हरमनप्रीत कौर आणि स्मृती मानधना यांनी गोलंदाजांवर वर्चस्व गाजवले. या दोघींनी मिळून संघाची धावसंख्या 30 षटकांत 150 च्या पुढे नेली. पुढील 10 षटकांत 56 धावा झाल्या, त्यामुळे संघाची धावसंख्या 40 षटकांत 207 धावांवर पोहोचली.
दरम्यान, मंधानाने मालिकेतील सलग दुसरे शतक झळकावले आणि हरमनप्रीतनेही तिचे अर्धशतक पूर्ण केले. पुढच्या 5 षटकांत मंधाना आणि हरमनप्रीतने मिळून 58 धावा केल्या. पण 46व्या षटकात 120 चेंडूत 136 धावा करून स्मृती बाद झाली, या डावात तिने 18 चौकार आणि 2 षटकार मारले. मंधाना आणि हरमनप्रीतची 171 धावांची भागीदारी झाली. त्यानंतर रिचा घोषने येताच आफ्रिकन गोलंदाजांची धुलाई करण्यास सुरुवात केली. तर हरमनप्रीतने शेवटच्या षटकात 16 धावा काढत आपले शतक पूर्ण केले. हरमनप्रीत आणि रिचा घोष दोघींही नाबाद माघारी परतल्या. हरमनप्रीतने 88 चेंडूत (9 चौकार आणि 3 षटकार)103 धावा तर रिचाने 13 चेंडूत 3 चौकार अन् 1 षटकारासह 25 धावा केल्या. अशाप्रकारे भारतानं 325 धावसंख्येपर्यत मजल मारली. स्मृतीचं हे 7 वे आणि हरमनप्रीतचं एकदिवसीय कारकिर्दीतील सहावं शतक होतं. दक्षिण आफ्रिकेकडून मसाबता क्लास आणि मलाबा यांनी प्रत्येकी एक विकेट घेतली.
IND vs SA 2nd ODI : स्मृती मंधानाचा तडाखा, सलग दुसऱ्या शतकासह केली अनेक विक्रमांची नोंद…
मंधानाने साधली बरोबरी…
दक्षिण आफ्रिकेविरुद्ध शतक झळकावल्यानंतर स्मृती मंधाना आता वनडे क्रिकेटमध्ये सर्वाधिक शतके झळकावण्याच्या बाबतीत संयुक्तपणे पहिल्या स्थानावर पोहोचली आहे. तिच्या आधी माजी कर्णधार मिताली राजने 211 डावात 7 शतके झळकावली होती. मात्र मंधानाने केवळ 84 डावांमध्ये ही कामगिरी केली आहे. मिताली राज आणि स्मृती मानधना यांच्या नावे आता प्रत्येकी 7 शतके आहेत. या बाबतीत हरमनप्रीत कौर दुसऱ्या स्थानावर पोहचली आहे, जिने आतापर्यंत 6 शतके झळकावली आहेत.





