Head Coach of Indian Cricket Team : भारतीय क्रिकेट नियामक मंडळाचे (बीसीसीआय) सचिव जय शाह यांनी भारतीय क्रिकेट संघाच्या मुख्य प्रशिक्षकपदी गौतम गंभीरची नियुक्ती जाहीर केली आहे. गौतम गंभीर टीम इंडियाचा इतिहासातील 25 वा मुख्य प्रशिक्षक बनणार आहे. राहुल द्रविडने टी-20 विश्वचषक 2024 नंतर मुख्य प्रशिक्षकपद सोडले होते. आता जुलैच्या अखेरीस सुरू होणाऱ्या श्रीलंकेविरुद्धच्या मालिकेत गंभीर भारतीय संघात नवीन प्रशिक्षक म्हणून सामील होणार आहे. सध्या राष्ट्रीय क्रिकेट अकादमीचे (NCA) संचालक व्हीव्हीएस लक्ष्मण झिम्बाब्वे दौऱ्यावर अंतरिम मुख्य प्रशिक्षकाची भूमिका बजावत आहेत.
बीसीसीआयचे सचिव जय शहा यांनी मंगळवारी गौतमची मुख्य प्रशिक्षकपदी नियुक्ती जाहीर केली. त्यांनी एक्स पोस्टद्वारे ही माहिती दिली. 42 वर्षीय गंभीर ‘द वॉल’ म्हणून प्रसिद्ध असणाऱ्या राहुल द्रविडची जागा घेणार आहे. टी-20 विश्वकरंडकानंतर द्रविड यांचा कार्यकाळ संपला आहे.
It is with immense pleasure that I welcome Mr @GautamGambhir as the new Head Coach of the Indian Cricket Team. Modern-day cricket has evolved rapidly, and Gautam has witnessed this changing landscape up close. Having endured the grind and excelled in various roles throughout his… pic.twitter.com/bvXyP47kqJ
— Jay Shah (@JayShah) July 9, 2024
गंभीरने दीड महिन्यांपूर्वी कोलकाता नाइट रायडर्सला आयपीएल-2024 चा चॅम्पियन बनवले होते. तो यावर्षी कोलकाता फ्रँचायझीचा मेंटर झाला. इतकेच नाही तर त्याच्या मार्गदर्शनाखाली गंभीरने लखनौ सुपर जायंट्स संघाला सलग दोन हंगाम प्लेऑफमध्ये नेले होते.
प्रशिक्षकपदाचा अनुभव नाही
42 वर्षीय गंभीरला आंतरराष्ट्रीय किंवा देशांतर्गत प्रशिक्षकपदाचा अनुभव नाही, तो दोन आयपीएल फ्रँचायझींमध्ये कोचिंग स्टाफची जबाबदारी सांभाळत आहे. आयपीएल 2022 आणि 2023 मध्ये तो लखनौ सुपर जायंट्सचा मार्गदर्शक होता, तर 2024 च्या हंगामात तो केकेआरमध्ये सामील झाला होता. गंभीरने एलएसजीमध्ये राहिल्यानंतर पहिल्या दोन हंगामात संघाला प्लेऑफमध्ये नेले होते. या व्यतिरिक्त कुठल्याही अंतरराष्ट्रीय संघाला प्रशिक्षण देण्याचा त्याच्याकडे अनुभव नाही.
गंभीरची कारकिर्द
एक खेळाडू म्हणून, 2007 मध्ये भारताच्या टी-20 विश्वकरंडक विजयात आणि 2011 मध्ये एकदिवसीय विश्वकरंडक विजयात गंभीर संघाचा भाग होता. त्याने 2011 ते 2017 या सात आयपीएल हंगामांसाठी कोलकाताचे नेतृत्व केले आणि ज्या दरम्यान फ्रंचायची पाच वेळा प्लेऑफसाठी पात्र ठरली होती. कर्णधार म्हणून त्याने 2012 आणि 2014 मध्ये दोनदा आयपीएल जेतेपदांना गवसणी घातली आहे.
किती आहे गंभीरचा कार्यकाळ?
टी-20 विश्वचषक 2024 संपल्यानंतर राहुल द्रविडने टीम इंडिया सोडली आहे. गौतम गंभीरच्या नेतृत्वाखाली टीम इंडियाची पहिली मालिका 27 जुलैपासून श्रीलंकेविरुद्ध सुरू होणार आहे. या महिन्याच्या शेवटी टीम इंडिया श्रीलंकेच्या दौऱ्यावर जाईल, जिथे दोन्ही संघांमध्ये 3 टी-20 आणि 3 एकदिवसीय सामने खेळवले जातील. गंभीरचा कार्यकाळ 31 डिसेंबर 2027 पर्यंत चालेल आणि या कालावधीत अनेक आयसीसी स्पर्धाही होणार आहेत.
गंभीरसमोर पहिले आव्हान पाकिस्तानमध्ये होणारी चॅम्पियन्स ट्रॉफी 2025 असेल, त्यानंतर भारताला 2025 मध्ये होणाऱ्या जागतिक कसोटी चॅम्पियनशिपच्या अंतिम फेरीत पोहोचण्याच्या मोठ्या आशा आहेत. 2026 मधील टी-20 विश्वचषक आणि 2027 मधील एकदिवसीय विश्वचषक ही गंभीरच्या कार्यकाळातील भारतीय संघाची शेवटची आयसीसी स्पर्धा असेल. अहवालांवर विश्वास ठेवला तर ,गौतम गंभीर प्रशिक्षक बनताच अनेक मोठे निर्णय घेऊ शकतो. तो मर्यादित षटकांच्या आणि कसोटी फॉरमॅटमध्ये वेगवेगळ्या खेळाडूंना कर्णधारपद देऊ शकतो, अशा बातम्या येत आहेत.