IND W vs AUS W : ऑस्ट्रेलिया महिला संघाला दंड! भारताविरुद्धच्या पराभवानंतर ICC ची कारवाई, नेमकं कारण काय?

ऑस्ट्रेलिया महिला संघाला आयसीसीने ठोठावला दंड –
आंतरराष्ट्रीय क्रिकेट परिषदेच्या (आयसीसी) नियमानुसार, ऑस्ट्रेलियाने दुसऱ्या एकदिवसीय सामन्यात निर्धारित वेळेत दोन ओव्हर कमी टाकल्यामुळे त्यांच्यावर हा दंड लावण्यात आला. आयसीसीच्या खेळाडू आणि सहाय्यक कर्मचारी यांच्यासाठीच्या आचारसंहितेच्या अनुच्छेद 2.22 नुसार, प्रत्येक कमी टाकलेल्या ओव्हरसाठी सामन्याच्या मानधनातून 5 टक्के दंड आकारला जातो.
यानुसार, ऑस्ट्रेलियाच्या संघाला 10 टक्के दंड ठोठावण्यात आला. ऑस्ट्रेलियाच्या संघाने हा दंड स्वीकारला असून, यामुळे औपचारिक सुनावणीची गरज भासली नाही. हा आरोप मैदानी पंच वृंदा राठी आणि जननी नारायणन, तिसरे पंच लॉरेन एजेनबॅग आणि चौथे पंच गायत्री वेणुगोपालन यांनी लावला होता. सामन्याचे पंच म्हणून जीएस लक्ष्मी यांनी काम पाहिले.
हेही वाचा – Asia Cup 2025 : मोहम्मद नबीने एकाच षटकात ५ षटकार ठोकत रचला इतिहास, अशी कामगिरी करणारा पहिलाच खेळाडू
भारताचा ऑस्ट्रेलियावर 102 धावांनी दणदणीत विजय –
ऑस्ट्रेलियाने नाणेफेक जिंकून प्रथम गोलंदाजी निवडली. भारताने 49.5 षटकांत 292 धावा केल्या. स्मृती मंधानाने 91 चेंडूंमध्ये 117 धावा (4 षटकार, 14 चौकार) काढल्या, ज्यात 77 चेंडूंमधील शतक भारतीय महिला क्रिकेटमधील दुसरे सर्वात जलद शतक ठरले. तिचे हे 12 वे एकदिवसीय शतक आहे. दीप्ती शर्माने 40, रिचा घोषने 29, प्रतिका रावलने 25 आणि स्नेह राणाने 24 धावा केल्या. ऑस्ट्रेलियाकडून डार्सी ब्राऊनने 3, तर अॅश्ले गार्डनर, मेगन स्कट, अॅनाबेल सदरलँड आणि ताहलिया मॅकग्रा यांनी प्रत्येकी 1 बळी घेतला.
हेही वाचा –Asia Cup 2025 सामन्यादरम्यान दुनिथ वेल्लालगेवर कोसळला दु:खाचा डोंगर, क्रिकेटविश्व हळहळले!
ऑस्ट्रेलियाचा डाव 190 धावांत आटोपला
प्रत्युत्तरात 293 धावांच्या लक्ष्याचा पाठलाग करताना ऑस्ट्रेलिया 40.5 षटकांत 190 धावांत गारद झाला, हा त्यांचा धावांनी सर्वात मोठा पराभव ठरला. अॅनाबेल सदरलँडने 45 आणि एलिस पेरीने 44 धावा केल्या. भारताकडून क्रांती गौडने 3 (9.5-28), दीप्ती शर्माने 2 (6-24), तर रेणुका सिंग, स्नेह राणा, अरुंधती रेड्डी आणि राधा यादव यांनी प्रत्येकी 1 बळी घेतला.





