#INDvSL 1st Test | डाव घोषित करण्याचा सल्ला मीच दिला

मोहाली – श्रीलंकेविरुद्धच्या पहिल्या कसोटीत 175 धावांची खेळी केलेल्या रवींद्र जडेजा याला द्विशतकाची संधी असतानाही कर्णधार रोहित शर्माने डाव घोषित केला होता. त्यावेळी त्याच्यावर टीका झाली होती.
त्याने मुद्दामच हा निर्णय घेतल्याची टीका सुरू झाली होती. मात्र, डाव घोषित कर असा सल्ला मीच रोहितला दिला होता, असा खुलासा जडेजाने केला व या चर्चांना पूर्णविराम देण्याचा प्रयत्न केला आहे.
या घटनेवरून भारतीय संघाच्या पाकिस्तानविरुद्धच्या कसोटीतील अशाच एका घटनेची आठवण झाली. पाकिस्तानच्या दौऱ्यात एका कसोटी सामन्यात मास्टर ब्लास्टर सचिन तेंडुलकर 194 धावांवर खेळत असताना तत्कालीन कर्णधार राहुल द्रविडने असाच डाव घोषित केला होता व त्यावेळी त्याला डाव घोषित करण्याचा सल्ला सौरव गांगुलीने दिला होता व त्याचे त्यावेळी सचिनशी बिनसले होते, अशाही चर्चा घडल्या होत्या.
मात्र, सचिनने असे काही नसल्याचे सांगत सारवासारव केली होती. जडेजा 175 धावांवर असताना रोहितने डाव घोषित केल्यावर अशाच चर्चा सुरू झाल्या होत्या. मात्र, अता जडेजानेच खुलासा केल्याने रोहितवरची टीका संपुष्टात येणार असेच संकेत मिळत आहेत.





