Suryakumar Yadav Record : टी-20 मालिकेतील पहिल्या सामन्यात भारताने ऑस्ट्रेलियाचा 2 गडी राखून पराभव केला. विशाखापट्टणम येथे खेळल्या गेलेल्या सामन्यात ऑस्ट्रेलियाने प्रथम फलंदाजी करत 208 धावा केल्या. प्रत्युत्तरात भारताने एक चेंडू शिल्लक असताना सामना जिंकला. टीम इंडियासाठी कर्णधार सूर्यकुमार यादवने चमकदार कामगिरी केली. त्याची ‘प्लेअर ऑफ द मॅच’ म्हणून निवड करण्यात आली. या सामन्यात सूर्याने रोहित शर्माचा विक्रम मोडला.
खरं तर, टी-20 इंटरनॅशनलमध्ये सर्वाधिक ‘प्लेअर ऑफ द मॅच’ पुरस्कार जिंकण्याच्या बाबतीत सूर्यकुमार तिसऱ्या क्रमांकावर पोहोचला आहे. या प्रकरणात त्याने रोहितला मागे सोडले. रोहितने 12 वेळा ‘प्लेअर ऑफ द मॅच’ पुरस्कार पटकावला आहे. तर सूर्याने 13 वेळा हा पुरस्कार जिंकला आहे.
या बाबतीत विराट कोहली आघाडीवर तर मोहम्मद नबी दुसऱ्या क्रमांकावर आहे. कोहलीनं 15 वेळा तर नबीने हा पुरस्कार 14 वेळा जिंकला आहे. विशेष म्हणजे सूर्याने यासाठी सर्वात कमी सामने खेळले आहेत. त्याने 54 सामन्यांत 13 वेळा पुरस्कार पटकावला आहे.
भारताने पाच सामन्यांच्या मालिकेत 1-0 अशी आघाडी घेतली आहे. आता या मालिकेतील दुसरा सामना 26 नोव्हेंबरला तिरुवनंतपुरममध्ये खेळवला जाणार आहे. यानंतर तिसरा सामना 28 नोव्हेंबरला तर चौथा सामना 1 डिसेंबरला होणार आहे. या मालिकेतील शेवटचा सामना 3 डिसेंबर रोजी होणार आहे.