पुणे जिल्हा | औद्योगिक महामार्ग त्या जमिनीतून जाणार नाही

राजुरी, (वार्ताहर) – बागायती व सुपीक जमिनीतून पुणे-नाशिक औद्योगिक महामार्ग जाणार नाही सर्व भूमिपुत्रांना विश्वासात घेऊनच निर्णय केला जाईल, असे आश्वासन खासदार अमोल कोल्हे व जुन्नरचे आमदार अतुल बेनके यांनी दिल्यानंतर राजुरी येथे पुणे-नाशिक औद्योगिक राष्ट्रीय महामार्ग बाधित शेतकर्यांचे मंगळवार (दि. 27) पासून सुरू करण्यात आलेले उपोषण बुधवारी (दि. 28) रात्री तूर्त स्थगित करण्यात आले.
पुणे-नाशिक औद्योगिक द्रुतगती महामार्ग क्रमांक 11 हा कायमस्वरूपी रद्द करा आणि भूसंपादन2013च्या कायद्याची अंमलबजावणी करा. या महामार्गात सुपीक बागायती क्षेत्र जात असल्याने शेतकरी हा उद्ध्वस्त व विस्थापित होणार आहे म्हणून साखळी उपोषण सुरू करण्यात आले होते.
या उपोषणाला पाठिंबा देण्यासाठी खासदार डॉ. अमोल कोल्हे आमदार अतुल बेनके, माजी आमदार शरद सोनवणे, विघ्नहर साखर कारखान्याचे अध्यक्ष सत्यशिल शेरकर, तहसीलदार सुनिल शेळके, माजी सभापती दीपक औटी, वल्लभ शेळके, माऊली खंडागळे, शरद लेंडे, तुषार थोरात, अकुश आमले, मोहीम ढमाले, अनंतराव चौगुले,
मंगेश काकडे, राजुरीच्या सरपंच प्रिया हाडवळे, उपसरपंच माऊली शेळके, एम. डी. घंगाळे, जी. के. औटी, मोहन नायकवडी आदी विविध गावचे सरपंच उपसरपंच बाधित शेतकरी उपस्थित होत पाठींबा व्यक्त केला. आमदार व खासदार तसेच अप्पर जिल्हाधिकारी तथा भू संपादन अधिकारी एच. व्हि. आरगुंडे यांच्या लेखी पत्रानंतर आंदोलन तूर्तस्तगीत केल्याचे औटी यांनी घोषित केले.
रेल्वे प्रकल्पाला खोडा घालून…
या महामार्गामुळे गावाचे भले होण्यासाठी कुठलीही गोष्ट घडत नाही. कुठलाही एक्सेस कंट्रोल रस्ता नाही. पुणे-नाशिक रेल्वे महामार्गाला कॅबिनेट मान्यतेपर्यंत गेला होता; मात्र जीएमआरटी दुर्बिण केंद्रामुळे ऐनवेळी त्यांच्या टेक्निकल गोष्टीने खोडा घातल्याची माहिती पुढे आली आहे.
पुढील अधिवेशनात या रेल्वे मार्गाबद्दल मी आवाज उठवणार आहे. आपण डीझेल-पेट्रोल दुसर्या देशातून आयात करत असताना रेल्वे प्रकल्पाला खोडा घालून सुसाट रस्ते बनवण्याची स्पर्धा सुरू झाली आहे. शेतकर्यांना जोपर्यंत नाही न्याय मिळत नाही तोपर्यंत मी आपणा बरोबर असल्याचे खासदार डॉ. कोल्हे यांनी नमूद केले.
गावाचे तुकडे-तुकडे होणार असेल तर मला वैयक्तिक ते मान्य नाही राज्य सरकारने जे अधीसूचना काढलेली आहे त्यास माझा विरोध आहे बागायती क्षेत्रातून आखलेला महामार्ग होऊ देणार नाही.
कोणी तो करण्याचा प्रयत्न केला तर त्याला विरोध करण्यासाठी मी शेतकर्यांच्या ही पुढे आंदोलनात उभा असेल. आपण बाधित शेतकर्यांचे प्रतिनिधी व आंदोलन करते लोकप्रतिनिधी, असे संयुक्त समिती गठीत करू आणि हा प्रश्न कसा, सोडवता येईल यासाठी प्रयत्न करू असे सांगितले. – अतुल बेनके, आमदार





