Indrayani Ghat : इंद्रायणी घाटावर रात्री अनोळखी लोकांचा वावर; गांजा, मद्यसेवनाने पावित्र्य धोक्यात
Indrayani Ghat : चोखोबा महाराज मंदिर ते वैकुंठस्थान दरम्यान संशयास्पद हालचाली वाढल्या; पोलिसांकडे रात्रीची गस्त वाढवण्याची ग्रामस्थांची मागणी.

Indrayani Ghat – संत तुकाराम महाराजांची पावन भूमी म्हणून जगभर ओळख असलेल्या देहू नगरीतील इंद्रायणी घाट परिसरात रात्रीच्या वेळी वाढलेल्या अनोळखी व्यक्तींच्या वावरामुळे सुरक्षेचा प्रश्न गंभीर बनला आहे. चोखोबा महाराज मंदिर ते वैकुंठस्थान मंदिर या दरम्यानच्या घाट परिसरात संशयास्पद हालचाली वाढल्याच्या तक्रारी पुढे येत असून ग्रामस्थ, वारकरी आणि भाविकांमध्ये चिंतेचे वातावरण निर्माण झाले आहे.
देहू येथे दररोज हजारो वारकरी, भाविक आणि पर्यटक दर्शनासाठी येतात. इंद्रायणी नदीच्या घाटावर सकाळपासून सायंकाळपर्यंत स्नान, पूजा-अर्चा आणि धार्मिक कार्यक्रमांसाठी मोठी गर्दी असते. मात्र रात्रीच्या वेळी या परिसरात अनोळखी व्यक्तींचा वाढता वावर नागरिकांच्या चिंतेचे कारण ठरत आहे. स्थानिक नागरिकांच्या म्हणण्यानुसार, अनेक अनोळखी पुरुष आणि महिला रात्री उशिरापर्यंत घाट परिसरात फिरताना किंवा झोपताना दिसून येतात.
काही जण मद्यपान, गांजा आणि सिगारेटचे सेवन करून घाट परिसरातच मुक्काम करत असल्याचेही निदर्शनास येत आहे. घाटावरील मेघडंबरीच्या ओवऱ्यांमध्ये काहींनी जणू कायमस्वरूपी वास्तव्य केल्याचे चित्र पाहायला मिळत असून त्यांचे अंथरुण-पांघरुण आणि इतर साहित्य दिवसभर तेथेच पडून असते. त्यामुळे इंद्रायणी घाटाचे सौंदर्य आणि स्वच्छता धोक्यात येत असल्याची भावना नागरिक व्यक्त करीत आहेत.
या व्यक्तींची ओळख, वास्तव्य किंवा उपजीविकेचे साधन याबाबत कोणतीही अधिकृत माहिती उपलब्ध नसल्याने ग्रामस्थांमध्ये विविध चर्चांना उधाण आले आहे. परिसरात चोरीच्या घटनांच्या तक्रारी समोर येत असून काही दिवसांपूर्वी अनुचित प्रकार घडल्याची चर्चा स्थानिकांमध्ये सुरू आहे. त्यामुळे घाट परिसरात येणाऱ्या भाविकांच्या सुरक्षेबाबत प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे.
याशिवाय सकाळी, सायंकाळी तसेच रात्री उशिरापर्यंत काही प्रेमीयुगुलांकडून सार्वजनिक ठिकाणी अशोभनीय वर्तन होत असल्याच्या तक्रारीही नागरिकांनी केल्या आहेत. धार्मिक आणि सांस्कृतिक दृष्ट्या महत्त्वाच्या असलेल्या या परिसरात अशा प्रकारच्या घटनांमुळे भाविकांच्या भावना दुखावल्या जात असल्याचे मत व्यक्त होत आहे.
दरम्यान, देहूरोड पोलिसांनी घाट परिसरात रात्रीची गस्त वाढवून संशयित व्यक्तींची पडताळणी करावी, तसेच आवश्यक ती प्रतिबंधात्मक कारवाई करावी, अशी मागणी ग्रामस्थ, वारकरी आणि भाविकांकडून होत आहे. देहू नगरपंचायत आणि देहू देवस्थान प्रशासनानेही घाट परिसरातील शिस्त, स्वच्छता आणि पावित्र्य टिकवून ठेवण्यासाठी तातडीने प्रभावी उपाययोजना राबवाव्यात, अशी अपेक्षा व्यक्त केली जात आहे.
घाटाचे पावित्र्य धोक्यात; वाढती अस्वच्छता चिंतेचा विषय
घाट परिसरातील अनेक ठिकाणी मद्याच्या रिकाम्या बाटल्या, सिगारेटची थोटके, प्लॅस्टिक कचरा तसेच इतर टाकाऊ साहित्य आढळून येत आहे. यामुळे केवळ परिसराच्या सौंदर्यावर परिणाम होत नसून स्वच्छतेचाही गंभीर प्रश्न निर्माण झाला आहे. संत तुकाराम महाराजांच्या पवित्र भूमीला साजेशे वातावरण राखण्यासाठी संबंधित प्रशासनाने नियमित स्वच्छता मोहीम, सुरक्षा व्यवस्था आणि देखरेख वाढवावी, अशी मागणी भाविकांकडून जोर धरत आहे. ग्रामस्थांनीही या परिसराचे पावित्र्य आणि स्वच्छता जपण्यासाठी सहकार्य करण्याचे आवाहन करण्यात येत आहे.






