Pune District : पाभे, भोमाळे, भोरगिरी येथील ढापे काढले
Pune District : त्यामुळे यंदा मान्सूनपूर्व काळातच प्रशासनाने खबरदारी म्हणून ढापे काढणे अपेक्षित होते. मात्र जूनच्या पहिल्या आठवड्यापर्यंतही ही कारवाई न झाल्याने ग्रामस्थांमध्ये चिंतेचे वातावरण निर्माण झाले होते.

राजगुरूनगर : खेड तालुक्यातील पाभे येथील भीमा नदीवरील पूल-कम-बंधार्याचे ढापे (बर्गे) काढण्यात आले असून, त्याचबरोबर भोमाळे व भोरगिरी येथील कोल्हापूर पद्धतीच्या बंधार्यांचेही ढापे हटविण्यात आले आहेत. त्यामुळे नदीकाठच्या गावांवर निर्माण होणारा संभाव्य पुराचा धोका टळल्याने ग्रामस्थांनी समाधान व्यक्त केले आहे.
मागील वर्षी बंधार्यांचे ढापे वेळेत न काढल्याने पाभे गावात पहिल्याच मुसळधार पावसात पाणी शिरले होते. त्यामुळे यंदा मान्सूनपूर्व काळातच प्रशासनाने खबरदारी म्हणून ढापे काढणे अपेक्षित होते. मात्र जूनच्या पहिल्या आठवड्यापर्यंतही ही कारवाई न झाल्याने ग्रामस्थांमध्ये चिंतेचे वातावरण निर्माण झाले होते.
यासंदर्भात ग्रामस्थांनी प्रशासनाकडे वारंवार पाठपुरावा करूनही प्रतिसाद मिळत नव्हता. दरम्यान, या गंभीर प्रश्नावर दैनिक प्रभातमध्ये 1 जूनच्या अंकात वृत्त प्रसिद्ध झाल्यानंतर प्रशासनाने तत्काळ दखल घेत दुसर्याच दिवशी पाभे येथील पूल-कम-बंधार्याचे ढापे काढण्याची कार्यवाही केली. गतवर्षी 25 ते 27 मे 2025 दरम्यान भीमाशंकर-भोरगिरी परिसरात झालेल्या मान्सूनपूर्व मुसळधार पावसामुळे भीमा नदीला मोठा पूर आला होता.
त्यावेळी पाभे येथील कोल्हापूर पद्धतीच्या पूल-कम-बंधार्याचे ढापे न काढल्याने पुराचे पाणी अडून फुगवटा निर्माण झाला होता. परिणामी पाभे व भोरगिरी येथील नदीकाठच्या अनेक घरांमध्ये पाणी घुसले होते. या घटनेत नागरिकांचे मोठे आर्थिक नुकसान झाले होते तसेच दोन दिवस नागरिकांना मोठ्या संकटाचा सामना करावा लागला होता.
यंदाही जून महिना सुरू होऊनही ढापे न काढल्याने ग्रामस्थांनी जलसंपदा विभाग, खेड पंचायत समितीच्या लघुपाटबंधारे विभागासह संबंधित यंत्रणांकडे तातडीने कारवाई करण्याची मागणी केली होती. पाभे, भोमाळे, भोरगिरी व परिसरातील नागरिकांनी संभाव्य धोका लक्षात घेऊन प्रशासनाला सतर्क केले होते. प्रशासनाने अखेर या मागण्यांची दखल घेत पाभे येथील पूल-कम-बंधारा तसेच भोमाळे, भिवेगाव आणि भोरगिरी येथील कोल्हापूर पद्धतीच्या बंधार्यांचे ढापे मान्सूनपूर्व काळात काढून घेतले. त्यामुळे मागील वर्षी निर्माण झालेल्या पूरस्थितीची पुनरावृत्ती टळली असून नदीकाठच्या नागरिकांचा जीव भांड्यात पडला आहे.
ग्रामस्थांमध्ये समाधानाचे वातावरण
बंधार्यांचे ढापे वेळेत काढल्यामुळे भीमा नदीच्या पात्रात पुराच्या पाण्याचा अडथळा निर्माण होणार नाही. त्यामुळे नदीकाठच्या घरांना, शेतीला व नागरिकांना होणारा संभाव्य धोका टळला असून ग्रामस्थांनी प्रशासनाच्या या कारवाईचे स्वागत केले आहे.





