Indonesia : इंडोनेशियामध्ये आग लागलेल्या बोटीमधून 560 जणांची सुखरूप सुटका

मनाद (इंडोनेशिया) : समुद्रात अचानक पेटलेल्या प्रवासी बोटीमधून ५६० पैकी जास्त प्रवाशांना सुखरुप सोडवण्यात आले असल्याचे आज जाहीर करण्यात आले. या आगीमध्ये मरण पावलेल्यांची संख्या ५ ऐवजी ३ असल्याचेही स्पष्ट करण्यात आले आहे. के.एम. बार्सिलोना ५ या प्रवासी बोटीला काल दुपारी अचानक आग लागली होती. सुलावेसी प्रांताची राजधानी मनादो शहराकडे ही बोट जात असताना मध्येच ही दुर्घटना घडली होती.
इंडोनेशियाच्या तटरक्षक दलाचे जहाज, बचाव पथकाच्या ६ बोटी आणि काही अग्निशामक बोटींनी बचाव मोहिम राबवली होती. पेटलेल्या बोटीतील प्रवाशांनी समुद्रात उड्या मारून आपला जीववाचवला होता. या प्रवाशांना बचाव पथकातील बोटींनी किनाऱ्यावर आणले होते. स्थानिक मच्छिममारांनी देखील लाईफ जॅकेट घालून अनेक प्रवाशांना वाचवण्यात मोलाचे योगदान दिले होते.
पेटलेल्या बोटीतील कोणीही बेपत्ता असल्याचे वृत्त नाही. तरी शोध आणि बचावकार्य सुरू ठेवले गेले आहे. / दुर्घटनेत मरण पावणाऱ्यांची संख्या ५ असल्याचे आगोदर जाहीर केले गेले होते. मात्र नंतर हा आकडा ३ असल्याचे जाहीर केले गेले. दोघेजण मृत घोषित केले गेले होते. पण ते जिवंत असल्याचे रुग्णालयाच्या सूत्रांनी स्पष्ट केले. यामध्ये २ महिन्यांच्या एका बाळाचाही समावेश आहे. समुद्राचे पाणी फुफुसांमध्ये भरल्यामुळे हे बाळ बेशुद्ध झाले होते. पण वैद्यकीय उपचारांनंतर बाळाचे प्राण वाचवण्यात यश आले आहे. या बोटीमध्ये ६०० प्रवाशांची क्षमता होती.





